परभणी : अखेर सातव्या दिवशी धावली एस.टी. बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:36 AM2018-07-31T00:36:27+5:302018-07-31T00:37:12+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक, जाळोपोळ होत असल्याने २३ जुलैपासून परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या परभणी, पाथरी, जिंतूर, गंगाखेड या चार आगारांतील बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
३० जुलै रोजी जिल्ह्यात शांतता होती. त्यामुळे एस.टी.महामंडळाकडून सोमवारी दुपारनंतर बसेस सुरु केल्या. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय सातव्या दिवशी दूर झाली.
दरम्यान, परभणी- जिंतूर, परभणी- गंगाखेड मार्गावरील बस सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु करण्यात आल्या नव्हत्या.