परभणी : पिंगळी येथे लागलेल्या आगीत चार हजार कडबा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:41 AM2019-04-22T00:41:00+5:302019-04-22T00:41:09+5:30
परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंगळी: परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
पिंगळी शिवारातील ज्ञानेश्वर बळीराम गरुड यांनी त्यांच्या शेतामध्ये कडब्याची वळई करुन ठेवली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक या कडब्याने पेट घेतला. वातावरणात वारा असल्याने आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती समजताच गरुड यांच्यासह इतर शेतकरी आग विझविण्यासाठी धावले; परंतु, शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे ४ हजार कडबा जळून खाक झाला. तसेच शेतात ठेवलेली २ हजार लिटरची पाण्याची टाकी, स्प्रिंकलरच्या ५० छड्या, सोयाबीनची गुळी जळून खाक झाली.
ही आग नेमकी कशी लागली, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर तलाठी दमणेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या आगीत शेतकऱ्याचे मोेठे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
४परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. दिवसाचे तापमान वाढत चालल्याने त्याचा परिणाम आगी सारख्या घटना होत आहेत. ज्वारीची काढणी झाली असून अनेक ठिकाणी कडब्याच्या वळई करुन ठेवल्या आहेत. तापमानामध्ये किंवा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याचे प्रकार होत असून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.