परभणीत आगीमध्ये तीन एटीएम मशीन जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:29 PM2019-12-04T12:29:46+5:302019-12-04T12:30:19+5:30
एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती याची माहिती बँक अधिकारी घेत आहेत.
परभणी : शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील इंडिया बँकेच्या एटीएम केंद्राला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीत तीन मशीन जळून खाक झाल्या आहेत.
येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या केंद्रात पैसे काढण्याबरोबरच खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी असलेली सीडीएम मशीन उपलब्ध आहे. ई इनेक्ट नावाने हे केंद्र चालविले जाते. बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या केंद्रातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक दशरथ डाके यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांना दिली. त्यानंतर अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. नानलपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्टेट बँकेचे अधिकारीही रात्रीच घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले? एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती? याची माहिती बँक अधिकारी घेत आहेत.