परभणी : तीन महिन्यांपासून पाच सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:51 PM2019-10-09T23:51:19+5:302019-10-09T23:52:06+5:30
जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या परभणी बसस्थानकातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या परभणी बसस्थानकातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्य परिवहन महामंडळ ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी दिवस-रात्र तत्पर असल्याचे दाखवूून देत आहे; परंतु, मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाकडून प्रवाशांना तोकड्या सोयी-सुविधा मिळत आहेत. कधी बस वेळेवर लागत नाही तर कधी बसस्थानकात असुविधांचा भरणा झाल्याने प्रवाशांना नेहमी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांपैकी परभणी आगारातून इतर आगारांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न महामंडळाला दिल्या जाते.
त्यामुळे या बसस्थानकात प्रवाशांची अधिक ये-जा असते. मागील काही वर्षापूर्वी या बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे बसस्थानक प्रशासन व बसस्थानकावरील पोलीस चौकी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाने व पोलीस प्रशासनाने संपूर्ण बसस्थानक परिसरात जवळपास १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातूून बसस्थानक परिसरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या बसस्थानकात चोरीच्या घटनांना आळा बसला; परंतु, मागील तीन महिन्यांपासून पोलीस चौकीमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ५ कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंद पडलेले हे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.