परभणी : चाराटंचाईकडे कानाडोळा ; कागदोपत्री खेळाने मिळविली शाबासकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:22 AM2019-05-18T00:22:53+5:302019-05-18T00:23:51+5:30
तालुका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री खेळ करीत तालुक्यातील चाऱ्याची परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात दाखवून देऊन शबासकी मिळविली; परंतु, चाºयाच्या शोधात उजाडलेला दिवस कधी मावळतो, अशी परिस्थिती तालुक्यातील पशूपालकांची आहे. याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
सत्यशील धबडगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : तालुका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री खेळ करीत तालुक्यातील चाऱ्याची परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात दाखवून देऊन शबासकी मिळविली; परंतु, चाºयाच्या शोधात उजाडलेला दिवस कधी मावळतो, अशी परिस्थिती तालुक्यातील पशूपालकांची आहे. याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाउस पडल्याने तालुक्याला गंभीर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून राज्य सरकारने जाहीर केले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्याचबरोबर पशूधनासाठी चाराही मिळाला नाही. उन्हाच्या तीव्रतेसह चाºयाचाही प्रश्न तालुक्यात गंभीर झाला आहे. त्यामुळे पशूधन कसे जगवावे? या चिंतेतून बहुतांश पशूपालक आपले पशुधन विक्रीसाठी काढीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुभती जनावरे सुद्धा विक्रीसाठी बाजारात दिसून येत आहे; परंतु, बाजारात पशुधनास भाव मिळत नसल्याने शेतकºयांपुढे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाढत्या उन्हामुळे ओढे, नदी-नाले तलाव कोरडेठाक पडले आहेत. विहीरींनी तळ गाठला आहे. परिणामी पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कार्यालयांमध्ये बसून कागदोपत्री खेळ करीत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादामध्ये तालुक्यात सद्यस्थितीत चारा छावण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे.
आता तालुक्यातील विविध १५ गावांतील सरपंचांनी १६ मे रोजी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांची भेट घेऊन आपापल्या गावातील पशुधनासाठी चारा छावणी उभारण्याची स्वतंत्ररित्या मागणी केली आहे. एकीकडे प्रशासन मूबलक चारा आहे, असे सांगत आहे. दुसरीकडे चारा उपलब्ध करुन देण्याची सरपंचानी मागणी केली आहे. त्यामुळे चाºयाच्या या गंभीर प्रश्नापासून प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा, घ्यावा अशी मागणी होत आहे.
पंधरा गावातून चारा चाराछावणीची केली मागणी
४काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दूरध्वनीवरून तालुक्यातील सरपंचांशी चर्चा केली होती. यावेळी भोसा येथील सरपंच संजय प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गावात चारा छावणी उभारण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मानवत तालुक्यात चाºयाची माहिती घेतली. तहसील प्रशासनाने कृषी विभाग, पशूसंवर्धन विभाग यांच्याशी तसेच गावातील ग्रामस्थांशी चर्चा करुन चारा मूबलक असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठिवला. या अहवालाविषयी माहिती मिळताच तालुक्यातील १५ गावांतील सरपंचांनी आपापल्या गावात चारा टंचाई निर्माण झाली असून चारा छावणी उभारण्याची मागणी केली आहे.
या गावातील सरपंचांचा समावेश
४तालुक्यातील भोसा, किन्होळा, मगर सावंगी, मानोली, उक्कलगाव, आंबेगाव, थार, रत्नापूर, सोमठाणा, वझुर बु, इरळद, भोसा, पाळोदी, करंजी, पिंपळा या गावातील सरपंचांनी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांची गुरूवारी भेट घेऊन चारा छावणी उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दादा कदम, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, कृऊबाचे उपसभापती पंकज आंबेगावकर, सरपंच सचिन दोडके, सुभाष जाधव, ज्ञानोबा शिंदे, एकनाथ पिंपळे, मुकुंद मगर, सीमा जाधव, महादेव काळे, राजाराम कुकडे, संजय प्रधान, देवराव टरपले, मीरा सुरवसे आदी सरपंच उपस्थित होते.
दररोज लागतो : १७२ मेट्रिक टन चारा
४मानवत तालुक्यात ३ महसुली मंडळे असून यातील गावांची संख्या ४९ आहे. २०१२ मधील १९ व्या जनगणनेनुसार तालुक्यात एकुण २८ हजार ५८४ पशूधन आहे. यामध्ये मोठे जनावरे २४ हजार ५९८, लहान जनावरे ३ हजार १७, शेळ्या-मेंढ्या ९६९ जनावारांचा समावेश आहे. या पशुधनासाठी प्रतिदिन १७२ मेट्रिक टन चारा लागतो म्हणजेच दर महिन्याला ५ हजार १४५ मेट्रिक टन चारा तालुक्यातील पशुधनासाठी उपलब्ध असणे गरजचे आहे.
४त्याचबरोबर एका मोठ्या जनवाराला ३५ ते ४० लिटर पाणी, एका लहान जनावराला १५ ते २० लिटर तर शेळी मेंढीला ३ ते ४ लिटर पाण्याची गरज लागते. दुष्काळी परिस्थितीत पाणी उपलब्ध होणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे जनावरे जगावयची असेल तर प्रशासनाने कागदोपत्री खेळ करणे सोडून देऊन पाण्याचा व चाºयाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी होत आहे.
तालुका कृषी अधिकारी, पशुधनविकास अधिकारी, आणि गटविकास अधिकारी यांचे पथक नियुक्त करुन चारा छावणीची मागणी केलेल्या गावात भेटी देउन या बाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात येईल.
-डी.डी. फुफाटे,
तहसीलदार, मानवत