परभणी : वन विभागाची पशुगणना कागदोपत्रीच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:10 AM2018-05-30T00:10:53+5:302018-05-30T00:10:53+5:30
येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत केवळ ३७६ पशू आढळले असून, ही पशुगणना कागदोपत्रीच केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे़ उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती करणारे शेकडो हरिण शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असताना वन विभागाच्या गणतीत मात्र केवळ १२७ हरीण आढळले आहेत़ त्यामुळे या गणनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत केवळ ३७६ पशू आढळले असून, ही पशुगणना कागदोपत्रीच केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे़ उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती करणारे शेकडो हरिण शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असताना वन विभागाच्या गणतीत मात्र केवळ १२७ हरीण आढळले आहेत़ त्यामुळे या गणनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
परभणी येथील वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत वन संपदेच्या संवर्धनाबरोबरच रक्षणाचे काम केले जाते़ पशूगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे़ दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशुगणना होते़ या गणनेतील पशूंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे शक्य होते़ त्यामुळे दरवर्षी वन विभागांतर्गत पशू गणना केली जाते़ मात्र वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या उदासिनतेमुळे ही गणना कागदोपत्रीच होत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात वन क्षेत्रात पशूंची संख्याही मोठी असताना वन विभागाने केलेल्या गणनेत केवळ ३७६ पशू आढळल्याची नोंद आहे़ ३० एप्रिल आणि १ मे असे दोन दिवस ही पशूगणना झाली़ जिल्ह्यातील पशूंची संख्या मोठ्या प्रमाणात असताना वन विभागाच्या नोंदीत मात्र ही संख्या बोटावर मोजण्याइतकीच दाखविण्यात आली आहे़ हरीण, काळवीट, मोर, लांडोर, कोल्हे, तरस, नीलगाय, उदमांजर, रानडुकर, वानर असे अनेक प्राणी जिल्ह्यातील वनक्षेत्रात वास्तव्याला आहेत; परंतु, पशुगणना करताना हे प्राणी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ पशूगणनेत सर्वाधिक १२७ हरणांची नोंद घेण्यात आली आहे़ त्यानंतर १२२ निलगाय आढळल्याची नोंदही घेण्यात आली. कोल्हा, मोर, लांडोर या पशूंची संख्या मात्र मोजकीच दाखविली आहे़ राज्यातील इतर जिल्ह्यांनी गणनेचे अहवाल वेळेत दिले; परंतु, परभणी जिल्ह्यात मात्र पशू गणनेचा अहवालच वेळेत प्राप्त झाला नाही़ पशूगणनेच्या माहितीसाठी सदर प्रतिनिधीने १५ दिवसांपासून पाठपुरावा केला़ त्यावेळी आणखी माहिती हाती आली नाही, हे ठराविक उत्तर वन विभागाकडून दिले जात होते़ ३७६ पशूंच्या मोजणीचा अहवाल जमा करण्यासाठी तब्बल २० दिवसांचा कालावधी लागला़ त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या रात्री नेमकी पशुगणना झाली कशील आणि त्यात एवढे कमी पशू आढळल्याने शंका निर्माण होत आहे़
वन विभागाने केलेल्या पशूगणनेमध्ये केहाळ, जिंतूर बिटात ५० प्राणी आढळले़ सावळी बिटामध्ये ३१, डिग्रस बिटात १२, इटोली २१, केहाळ २९, मोहखेड २०, परभणी २७, टाकळखोपा १९, चौधरणी ३८, आरखेड २८, मानकेश्वर १३ आणि सावरगाव बिटामध्ये ३८ प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे़
सावरगाव बिटामध्ये १२ हरीण, १२ निलगाय, ३ कोल्हे, १ मोर, एक लांडोर, ७ पानकोंबड्यांची नोंद घेण्यात आली़ मानकेश्वर बिटात ५ निलगाय, दोन ससे आणि ६ रानडुकरे आढळली़ आरखेड बिटामध्ये ५ हरीण, ४ निलगाय, २ कोल्हे आणि ९ बगळे आढळले आहेत़ तर एका सुतार पक्ष्याची नोंदही या बिटामध्ये घेण्यात आली आहे़
बिबट्याने केले होते सळो की पळो
तीन महिन्यांपूर्वी पूर्णा तालुक्यातील देवठाणा परिसरात एका बिबट्याने थैमान घातले होते़ दररोज शेतकºयांच्या पशुधनावर डल्ला मारला जात होता़ या काळातही वन विभागाने सुरुवातीला तो बिबट्या नसल्याचाच निर्वाळा दिला; परंतु, बिबट्यामुळे शेतकरी हैराण झाल्यानंतर मात्र वन विभागानेही या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट केले होते़
त्याचा शेतकºयांना मात्र त्रास सहन करावा लागला़ जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी बिबट्या आढळला होता, अशी नोंद या पशुगणनेत घेतली असती तर शासनाकडून यापुढे करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात ठोस पावले उचलली गेली असती किंवा बिबट्या पकडण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यासाठी किमान निर्णय झाला असता.
या बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल दीड महिना वन विभागाच्या कर्मचाºयांनी सापळा लावून प्रयत्न केले़ मात्र बिबट्या काही हाती लागला नाही़ विशेष म्हणजे, वन विभागातील कर्मचारी बिबट्यासारख्या हिंस्त्र पशूला पकडण्यासाठी प्रशिक्षित झालेले नाहीत़ त्यांना या प्राण्यांना पकडण्याचा अनुभव नाही़
४केहाळ, जिंतूर बिटात सर्वाधिक पशू
वन विभागाने केलेल्या गणनेमध्ये जिंतूर आणि केहाळ या बिटामध्ये पशूंची संख्या अधिक असल्याची नोंद घेतली आहे़ त्यात केहाळ बिटात २० हरीण, २२ निलगाय, ३ मोर आणि ५ ससे आढळले़ जिंतूर बिटात ३० हरीण, ८ नीलगायी, ३ कोल्हे, २ ससे आणि ७ लांडगे आढळले आहेत़ विशेष म्हणजे, संपूर्ण पशुगणनेमध्ये केवळ जिंतूर बिटातच लांडग्यांची नोंद घेण्यात आली आहे़ तर या पशुगणनेत वन विभागाच्या अधिकाºयांना केवळ भोगाव बिटामध्ये ८ वानर आढळले आहेत़
जिंतूर बिटात सर्वाधिक हरीण
या पशुगणनेत जिंतूर बिटामध्ये सर्वाधिक ३० हरीण असल्याची नोंद घेण्यात आली़ त्यानंतर केहाळ बिटात २०, परभणी बिटात २०, सावळी १५, सावरगाव १२, चौधरणी १२, धारखेड ५, डिग्रस ५, मोहखेड ९ आणि टाकळखोपा बिटात केवळ १ हरीण आढळला़
परभणीतही हरिणांचा कळप
परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज हरिणांचे कळप फिरतात. कारला, कुंभारी परिसरातील हरिणांविषयीची माहिती शेतकरी देत आहेत़ कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरही मोठ्या संख्येने हरीण दाखल होतात़ कोल्हे, लांडगे, रानडुकरांच्या उपद्रव्याने एकीकडे शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे गणनेत मात्र या प्राण्यांची संख्या कमी दिसत आहे़