परभणी : जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षांपासून सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:39 AM2018-11-17T00:39:22+5:302018-11-17T00:39:57+5:30
येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे.
परभणी येथील तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नोंदवहीत खाडाखोड करीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर अन्य दोघांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील हे अत्यंत बारकाईने करीत आहेत.
तपासामध्ये पोलिसांनी अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये कोरे स्टॅम्प पेपर, जात प्रमाणपत्र, इतर सहायक कागदपत्रे, तहसीलदार यांच्या नावाचा शिक्का, रेशन कार्ड, निजामकालीन दस्ताऐवज आदींचा समावेश आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कागदपत्रेही संबंधित आरोपींकडे आढळले आहेत. या कागदपत्रांमध्ये ५ ते ६ वर्षापूर्वीचे देखील काही कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे बनावट कागदपत्रे देऊन बनावट प्रमाणपत्र मिळवून लाभ पदरात पाडून घेत सुरु केलेला जात चोरीचा हा धंदा अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. बनावट जात प्रमाणपत्र मिळवून काहींनी शासकीय नोकरी मिळविली, शिक्षणासाठी सवलत मिळविली, राजकीय लाभाची पदेही मिळविली असल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. या प्रकरणात खाजगी व्यक्तींसह शासकीय कर्मचारी- अधिकारीही गुंतले असल्याने संबंधितांची नावे समोर आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत जवळपास २७ जणांना नोटिसा दिल्या आहेत. १५ जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी व्यक्ती आदींचा समावेश आहे. पोलीस तपासात नवनवीन माहिती समोर येत असल्याने आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अत्यंत गोपनीय पद्धतीने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात महिला कर्मचाºयांचेही जबाब घेतले जात आहेत.
दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी
४या प्रकरणात पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी रात्री सय्यद अबरार इलाही व शेख शफाहेद शेख फारुख या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्या. वैशाली पंडित यांनी दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अॅड. इम्तियाज खान यांनी आरोपी शफाहेद शेख यांच्या जामिनासाठी लगेचच अर्ज केला. त्यावर न्या.पंडित यांनी १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. आरोपी सय्यद अबरार इलाही यांच्या वतीने अॅड.भूतडा यांनी काम पाहिले.