परभणी : तीन वर्षांच्या सर्व्हेक्षणात आढळले ९४ मुन्नाभाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:06 AM2019-06-10T00:06:30+5:302019-06-10T00:07:13+5:30
जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोणताही वैद्यकीय परवाना नसताना केवळ पैशांच्या अमिषापोटी जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाºया बोगस डॉक्टरांवर जिल्हा प्रशासनाने बडगा उगारला आहे. ग्रामीण भागात अशा डॉक्टरांची संख्या अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील आरोग्य विभागाने शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व्हेक्षण केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे धडक मोहीम राबविण्यात आली. २०१७-१८ या वर्षात १२४ खाजगी दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८ संशयित वैद्यकीय व्यावासयिक आढळून आले. त्यापैकी ४ बोगस व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर उर्वरित चार जणांनी दवाखाना बंद करुन पोबारा केला. जिल्ह्यात ग्रमाीण भागामध्ये आणि काही प्रमाणात शहरी भागातही अशा प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. तीन वर्षात ९४ डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून संशयित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या १०१ एवढी आहे. यापुढेही बोगस डॉक्टरांविरुद्धही मोहीम सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एम. शिंदे यांनी दिली.
जिंतूरमध्ये सर्वाधिक संशयित डॉक्टर
४जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षात केलेल्या सर्व्हेक्षणात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५३ संशयित डॉक्टर आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार परभणी तालुक्यात ११, पूर्णा ४, पालम ३, सोनपेठ ३, पाथरी ६, मानवत १६ आणि गंगाखेड तालुक्यात ७ असे एकूण १०१ संशयित डॉक्टर या काळात आढळले आहेत.
४ या संशयित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता आहे.
जिल्हा, तालुकास्तरावर समित्या
४२०१४-१५ पासून जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांची शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. २०१७-१८ मध्ये बोगस डॉक्टरांच्या संदर्भाने शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखान्यांची चेकलीस्टप्रमाणे तपासणी करण्यात आली होती.
बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई
४जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संशयित डॉक्टरांची शोध मोहीम सुरु ठेवली जाणार आहे. या अंतर्गत वैद्यकीय व्यवसायाचा परवाना उपलब्ध नसताना संबंधित व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (१) (२) अन्वये कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.