परभणी : पत्नीसह चौघांची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:09 AM2018-10-31T00:09:29+5:302018-10-31T00:11:05+5:30
पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पत्नीसह तिचे वडील आणि इतर तिघांची परभणीच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पत्नीसह तिचे वडील आणि इतर तिघांची परभणीच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या निकालासंदर्भात अॅड.राजू शिंदे यांनी दिलेली माहिती अशी : नगर येथील पूजा शहाणे यांचा विवाह २ मे २००७ रोजी पाथरी येथील गिरीष जोजारे यांच्यासमवेत झाला होता. मात्र विवाहानंतर पती-पत्नीचे आपसात पटत नसल्याने पूजा शहाणे यांनी गिरीष जोजारे व इतर नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत नगर येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. याच दरम्यान ३ जून २००९ रोजी गिरीष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुन गिरीष यांचे वडील सुभाष जोजारे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पूजा शहाणे, तिचे वडील आणि इतर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील अॅड. राजू शिंदे यांनी असा बचाव केला की, आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही. त्यामुळे आरोपींना निर्दोष सोडावे. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड.राजू शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.मोहम्मद शाहेद यांनी सहकार्य केले.