परभणी : दैठणा येथील बँक चोरी प्रकरणात चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:30 AM2020-02-09T00:30:11+5:302020-02-09T00:30:40+5:30
मागील महिन्यात दैठणा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून, गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपीने मुंबईच्या तिघांची मदत घेऊन हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील महिन्यात दैठणा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून, गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपीने मुंबईच्या तिघांची मदत घेऊन हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२८ जानेवारी रोजी मध्यरात्री दैठणा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या खिडकीचा गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तिजोरीचे कुलूप तोडले होते. मात्र सायरन वाजल्याने साथीदारांसह तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपी गोविंद कठाळू काळे याचा समावेश असून, त्याने तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. या आधारे, पोलिसांनी सापळा रचून धसाडी येथून गोविंद काळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच संतोष आनंद हियाल (रा.रावलकेल्ला, ता.बडगर, जि.सहला उडिसा, ह.मु.बांद्रा येथील झोपडपट्टी), विकास ऊर्फ बंटी सादरसिंग मीना (२३, रा.नई आबादी मक्सी, जि.साजापूर मध्यप्रदेश, ह.मु. नालासोपारा), मंगेश ऊर्फ रुपलाल नागले (रा.मोर्शी, जि.अमरावती, ह.मु. नालासोपारा) यांना सोबत घेऊन चोरी केल्याचे सांगितले.
गणेश काळे याने दिलेल्या माहितीनंतर उर्वरित तीन आरोपी हे लोणावळा (जि.पुणे) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनाही ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारणा केली असता दैठणा येथील बँक फोडल्याचे तसेच गंगाखेड, सोलापूर, लोणावळा व इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, राम काळे, राजेश अगाशे, संजय शेळके यांनी केली.
उरुसात वाढल्या भुरट्या चोऱ्या
येथील उरुसात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे़ काही जणांचे मोबाईल, कोणाचे पॉकेट तर महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडल्या असून, पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद करण्यात आली आहे़
खानापूर येथील प्रल्हाद गोपाळराव शिंदे यांचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल ७ फेब्रुवारी रोजी रात्री चोरीला गेला़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, हेकॉ सातपुते तपास करीत आहेत़
सेलू येथील अॅड़ अनिता बन्सी धुळे यांची पर्स ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उरुसातून चोरीला गेली़ अनिता धुळे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ पर्समध्ये १ हजार ५०० रुपये, एटीएम कार्ड, पॅनकार्ड आदी साहित्य असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़
परभणी शहरातील शनिवार बाजार भागातून मोबाईल चोरी झाल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली़ शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने विद्यानगरातील मोहनराव पत्तेवार हे बाजार करण्यासाठी या भागात आले होते़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा मोबाईल लांबविला़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़
दोन मोटारसायकलसह हत्यारे जप्त
पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून दोन मोटारसायकलसह घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे अॅडस्टेबल पान्हा, पंक्चर काढण्याचा टोचा, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड आदी साहित्य जप्त केले आहे.
विविध ठाण्यांत सहा गुन्हे दाखल
आरोपींच्या विरोधात दैठणा पोलीस ठाण्यासह गंगाखेड, सोलापूर (ग्रामीण), लोणार (ग्रामीण), लोणार शहर या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.