परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:21 AM2018-10-08T00:21:58+5:302018-10-08T00:22:45+5:30
पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
मोहन बोराडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
गतवर्षी दुधना प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे दोन्ही कालव्याद्वारे रबी हंगाम व उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात आले होते. तसेच परभणी, पूर्णा व नांदेड या शहरांना नदीपात्राद्वारे पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही शहरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला होता; परंतु, यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे दुधनात समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. जून व आॅगस्ट महिन्यातील काही दिवसच पाऊस पडला. तोही भीज पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होऊ शकली नाही. दरवर्षी परतीच्या पावसामुळे दुधनेची पाणीपातळी वाढते. मात्र यंदा परतीचा पाऊस न बरसताच परतल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आगामी काळात प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले झाले आहे. आगामी नऊ महिने विनापावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा विचार केला असता नदीपात्राद्वारे पाणी सोडणे शक्य होणार नाही. कारण नदीपात्राद्वारे पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. परिणामी पाणीसाठा वेगाने कमी होतो. दरम्यान, परतीच्या पावसाच्या आशा माळल्याने उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे.
दुधनेवर तीन शहरांची मदार
दुधना प्रकल्पातून सेलू तसेच जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर या शहरांना व आठगाव पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वर्षाकाठी या योजनेला सुमारे ६ दलघमी पाणी लागते. येलदरी प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने परभणी व पूर्णा शहराला दुधनेतून पाणी देण्यात आले; परंतु, सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा नसल्याने दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. सेलू, मंठा व परतूर शहराला सद्यस्थितीत तरी पाणीटंचाई भासणार नाही.
२२ टक्के जिवंत साठा
सध्या दुधना प्रकल्पात एकूण १५६.८८ दलघमी पाणीसाठा असून तो ४५.५७ टक्के आहे. यातील ५४.२८ दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २२.४१ टक्के आहे. पाटबंधारे विभागामार्फत १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा समजला जातो. त्यामुळे ३१ आॅक्टोबरनंतर प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.