परभणी : चार महिलांनी लंपास केली तीन लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:46 PM2020-03-17T22:46:10+5:302020-03-17T22:46:29+5:30
दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून चार महिला चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून चार महिला चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली आहे.
पूर्णा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील आडत बाजारपेठेतील श्रीराम ट्रेडींग कंपनी या दुकानाचे मालक विशाल लक्ष्मीनारायण चितलांगे हे चहा पिण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले होते. यावेळी गल्ल्याची चावी तशीच राहीली. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास चार महिला भिक मागण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आल्या. या महिलांनी दुकानात प्रवेश केला तेव्हा दुकानात कोणीही नसल्याची संधी साधत गल्ल्यातील रोख ३ लाख रुपये चोरून महिलांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. दुकान मालक विशाल चितलांगे हे दुकानात आल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व घटनाक्रम दिसून आला.
याबाबत शहरात चौकशी केली असता नवा मोंढा भागातून या महिला आॅटोरिक्षात बसून रेल्वेस्थानकापर्यंत गेल्या असल्याची माहिती आॅटोरिक्षा चालकाने पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोन पथकांची स्थापना केली असून, हे पथक वसमत व नांदेडकडे रवाना झाले आहेत.