Parbhani: राष्ट्रीय लोक अदालतीत साडेचौदा हजार प्रकरणे निकाली, १५ कोटी ६६ लाख १६ हजार रुपयांची वसुली
By राजन मगरुळकर | Published: December 10, 2023 01:20 PM2023-12-10T13:20:38+5:302023-12-10T13:21:10+5:30
Parbhani News: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४ हजार ४५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
- राजन मंगरुळकर
परभणी - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४ हजार ४५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली निघालेल्या प्रकरणातून एकूण १५ कोटी ६६ लाख १६ हजार ५४७ रुपयांच्या रकमेची वसुली झाली.
परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष उज्वला म.नंदेश्वर यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.जी.लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोड पात्र, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणी वगळून), पाणी आकार वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे व बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणी ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख न्यायाधीश यासह वकील संघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अशी होती दाखल प्रकरणे, झालेली वसूली
यामध्ये न्यायालयातील प्रलंबित असलेल्या ९४९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये दहा कोटी ३१ लाख ८२ हजार १८४ रुपये वसुली झाली. स्पेशल ड्राईव्ह २५८ सीआरपीसीमध्ये अकराशे ३७ प्रकरणी निकाली निघाली. तर वाद दाखल पूर्व इतर प्रकरणे १२ हजार ३६८ ठेवण्यात आली होती. या प्रकरणातून पाच कोटी ३४ लाख ३४ हजार ३६३ रुपयांची वसुली झाली.