परभणी: चौदा शिक्षक निघाले खोटारडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:33 AM2018-08-26T00:33:35+5:302018-08-26T00:34:32+5:30
आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणांतर्गत काही महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन पद्धतीने करण्यात आल्या होत्या. या संदर्भातील माहिती देत असताना अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, या करीता आरोग्यविषयक समस्यांची खोटी कागदपत्रे जोडली. तर काही शिक्षकांनी खोटे अंतर, पती-पत्नी एकत्रिकरण, पाल्याचे आजारपण या बाबतची खोटी माहिती शासनाला सादर केली. त्यानंतर शासन निर्णयानुसार या शिक्षकांच्या बदल्याही झाल्या; परंतु, या संदर्भात काही शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांच्या माहितीची पडताळणी करण्यात आली.
त्यामध्ये १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन नियुक्ती मिळविली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या १४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. शिवाय त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पाठविले जाणार आहे. ही कारवाई येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हा परिषद प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे.
खोट्या माहितीने इतर शिक्षकांवर अन्याय
१४ शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीचे ठिकाण मिळविले असले तरी त्याचा त्रास मात्र इतर शिक्षकांना झाला आहे. पात्र शिक्षकांना या शिक्षकांमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. शिवाय संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या खोटी माहिती देणाºया शिक्षकांच्या कामात वापरली गेली. त्यामध्ये अधिकाºयांचा वेळ वाया गेला. शिवाय कर्मचाºयांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. असे असले तरी प्रशासकीय पातळीवर मात्र या शिक्षकांवर गंभीर कारवाई करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली नाही. केवळ एक वेतनवाढ रद्द करणे व परत जुन्या शाळेवर पदस्थापना देणे याच दोन तरतुदी शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेची कासवगतीने कारवाई
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये संपन्न झाली. त्यानंतर विशेष संवर्ग भाग १, विशेष संवर्ग भाग २ नुसार सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाºयांच्या माहितीची पडताळणी १० जुलैपर्यंत करण्याचे शासनाने बजावले होते. त्यानंतर त्यांच्यावर २० जुलैपर्यंत कारवाई पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आले होते; परंतु, परभणी जिल्हा परिषदेत या संदर्भात अत्यंत मंदगतीने कारवाई सुरु आहे. २५ आॅगस्टपर्यंत याबाबत कारवाई झालेली नाही. आता पुढील आठवड्यात या संदर्भातील आदेश निघण्याची शक्यता आहे.