परभणी : पाथरी तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:25 AM2018-08-07T00:25:54+5:302018-08-07T00:26:09+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
पाथरी येथे १९ जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ६ आॅगस्ट रोजी महिला, विद्यार्थी व सकल मराठा समाजाच्या वतीेने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला.
सकाळी १० वाजल्यापासून राष्टÑीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात समाजबांधव दाखल झाले. या मोर्चामध्ये सुरुवातीला मुली, महिला, मुले व त्यानंतर समाजबांधव अशा रांगेत मोर्चा निघाला. हा मोर्चा प्रमुख रस्त्यावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण का आवश्यक आहे? यावर काही मुलींनी मार्गदर्शन केले. तब्बल दोन तास तहसील कार्यालयात हे आंदोलन चालले. आंदोलनकर्त्या पाच मुलींनी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना दिले. यावेळी तहसीलदार एस.डी. मांडवगडे यांची उपस्थिती होती. दरम्यान, मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आरक्षणासाठी सोनपेठमध्ये जागर
सोनपेठ- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोनपेठ शहरात सोमवारी सकाळी जागर गोंधळ घालण्यात आला़
सोनपेठ येथे शिवाजी चौकात शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ तालुक्यातील मराठा समाजबांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत़
दररोज नवनवीन उपक्रम राबविले जात असून, सोमवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जागर गोंधळ घालण्यात आला़ दुपारी विविध वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे निवेदन
जिंतूर- राज्य शासनाने घोषित केलेले मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करावे, अशी मागणी जिंतूर येथील मुस्लीम समाजबांधवांनी ६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़
जनजागरण समिती शाखा जिंतूर, जमियत ए उलमा या संघटनांसह स्थानिक मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते़ १९ जुलै २०१४ रोजी न्यायालयाने मुस्लिम समाजास आरक्षण लागू करण्यासंदर्भात आदेश दिले आहे़ मात्र २०१४ नंतर भाजप सरकारने आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे़ तेव्हा मुस्लिम समाजालाही तातडीने ५ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे़
मुंडण करून निषेध
सेलू- मराठा क्रांती ठोक मोर्चाला दिवसेंदिवस पाठींबा वाढत असून, रविवारी सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील मराठा युवकांनी मुंडण करून भाजप सरकारचा निषेध नोंदविला़
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तालुक्यात १५ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू असून, अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही़ रविवारी डिग्रसवाडी येथील अनंत लेवडे या युवकाने आरक्षणासाठी स्वत: पेटवून घेत आत्महत्या केली़ मात्र तरीही शासन वेळकाढूपणा करीत आहे़ त्यामुळे गुगळी धामणगाव येथील युवकांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला़