परभणीत भर दिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:54 AM2018-01-11T00:54:20+5:302018-01-11T00:54:30+5:30
शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
रविराज पार्क भागात विजय सोनी यांचे निवासस्थान आहे़ सोनीे यांच्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले असल्याने बुधवारी दिवसभर या घराला कुलूप होते़ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सोनी घरी परतले तेव्हा दरवाजा उघडा दिसला व कुलूप तुटलेले होते़ आतमध्ये जाऊन पाहिले तेव्हा सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते़ चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली़
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंग ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक पवार, बीट जमादार शेख गौस, रमेश मुजमुले यांनी घटनास्थळी भेट दिली़ चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण केले होते़ श्वानाने याच भागात असलेल्या मातोश्रीनगराजवळील कॅनॉलच्या पुलापर्यंत माग काढला़ ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत़ मिळालेल्या माहितीनुसार सोनी यांच्या घरातील नगदी २ हजार रुपये आणि अडीच तोळे सोने, एक तोळा चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत़ तर सोनी यांच्या घराशेजारीच बिनॉय हे केरळीयन कुटूंब वास्तव्याला आहे़ हे घरही चोरट्यांनी फोडले़ परंतु, या ठिकाणी किरकोळ साहित्याची चोरी झाली़ भर दिवसा दोन घरे फोडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दरम्यान, या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़
पूर्णेत दोन लाखांची घरफोडी
पूर्णा : शहरातील क्रांतीनगर भागात ९ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घरात घुसून २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला़ या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवाशी अजमत खान सालार खान पठाण यांच्या घरात मंगळवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश केला़ घराच्या छतावरून चोरटे आत शिरले़ घरातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी १ लाख ५० हजार रुपये असा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अजमत खान पठाण यांनी पोलिसांना माहिती दिली़ रात्री गस्तीवर असलेले फौजदार गणेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर परिसरातील रस्त्यांवर नाकेबंदी करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र चोरटे सापडले नाहीत़ अजमत खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे़