परभणी : ९ ग्रा.पं.च्या खात्यावर २१ लाखांचा निधी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:48 AM2019-06-22T00:48:32+5:302019-06-22T00:49:04+5:30
जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत जमा असलेल्या खनिज विकास निधीतून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर निधी पैकी पन्नास टक्के म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा निधी पंचायत समितीने २० जून रोजी ९ ग्रामपंचायतींना वर्ग केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : परभणी जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत जमा असलेल्या खनिज विकास निधीतून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर निधी पैकी पन्नास टक्के म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा निधी पंचायत समितीने २० जून रोजी ९ ग्रामपंचायतींना वर्ग केला आहे.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रावर गौणखनिजाचे उत्खनन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण उत्पन्नाचा काही भाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावच्या विकासासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. तालुक्यातील रामपुरी, वांगी, उक्कलगाव, कोल्हा, इरळद, कोल्हावाडी, हटकरवाडी, खरबा, रुढी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आला होते.
या बदल्यात लाखोंचा महसूल जमा झाला होता. यापैकी काही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामपंचायतीनी गावातील महत्त्वाची व अती महत्त्वाच्या कामांची यादी करुन या कामाचा ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविला. जि.प. ने हे ठराव आणि कामाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली. या कामांची छाननी करुन ९ ग्रामपंचायतींना विकासकामासाठी एकूण ४२ लाख रुपायांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पैकी ५० टक्के निधी मिळाला आहे. उर्वरीत ५० टक्के निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार होता. यामध्ये कोल्हावाडी गावासाठी ११ लाख रुपये, हटकरवाडी ७१ हजार ५५९ , खरबा ३८ हजार ८५९, रुढी ३ लाख ४५ हजार ७१५ रुपये, रामपुरी ७३ हजार ३७६, वांगी ४ लाख ५२ हजार ९२२, उक्कलगाव ६४ हजार ७६५, कोल्हा १९ हजार ३९८ रुपये, इरळद ६ हजार ७६३ असा एकूण २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा ५० टक्के निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला होता. मार्च अखेरीस या ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिले होते; परंतु, पं.स.च्या संथ कारभारामुळे हा निधी पडून होतो. यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रस्तावित कामांना ब्रेक लागला. तातडीने हा निधी वर्ग न झाल्याने काम पूर्ण झाल्यानंतर मिळणारा दुसरा टप्पा लांबला आहे. जून महिना संपत आला तरी हा निधी वर्ग करण्याच्या संदर्भात कोणतीच हालचाल होत नसल्याने पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होेते. मात्र १९ जून रोजी तातडीने ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी वर्ग झाल्याने या निधीतून पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, अंगणवाडी, शाळेसाठी साहित्य खरेदी, पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, सिमेंट रस्ते, पथदिवे बसविणे, पाणलोट, स्वच्छता आदी कामे केली जाणार आहेत. दरम्यान, हा निधी ग्रा.पं.च्या खात्यामध्ये वर्ग झाल्याने प्रस्तावित कामातील अडथळा दूर झाला आहे.
प्रशासनाने घेतली दखल
४खनीज विकास प्रतिष्ठानंतर्गत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना मंजुर झालेला २१ लाखांचा निधी पंचायत समिती कार्यालयाकडे पडून होता. यामुळे ग्रामपंचायतीनी प्रस्तावित केलेली कामे रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० जून रोजी प्रसिद्ध केले होते.
४या वृत्ताची दखल घेत पंचायत समिती कार्यालयाने जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवून तातडीने संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यावर हा निधी वर्ग केला आहे. यामुळे रखडलेली कामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रा.पं.ला मंजूर झालेला निधी
४कोल्हावाडी २१ लाख ६४ हजार रुपये, हटकरवाडी १ लाख ४३ हजार, खरबा ७७ हजार, रुढी ३ लाख ९ हजार, रामपुरी बु. १ लाख ४६ हजार, वांगी ९ लाख २१ हजार, इरळद १३ हजार ५००, उक्कलगाव १ लाख २९ हजार असा एकूण ४२ लाखांचा निधी गौण खनीज प्रतिष्ठानंतर्गत मंजुर करण्यात आला.
४मात्र यातील उर्वरित निधी पंचायत समितीला वर्ग केला आहे. उर्वरीत ५० टक्के निधी काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीना मिळणार आहे.