परभणी : आठ पालिकांना सात कोटींचा निधी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:29 AM2018-02-06T00:29:35+5:302018-02-06T00:29:40+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील ७ नगरपालिका व एका नगरपंचायतीला नगरोत्थान आणि दलितेत्तर वस्त्या सुधार योजनेंतर्गत ६ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील ७ नगरपालिका व एका नगरपंचायतीला नगरोत्थान आणि दलितेत्तर वस्त्या सुधार योजनेंतर्गत ६ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे़
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शहरी भागामध्ये विविध विकासात्मक कामे करण्यासाठी नगरपालिकांना निधी देण्यात येतो़ त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीला दलितेत्तर व नगरोत्थान महाअभियान या दोन योजनांतर्गत निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता़
त्यानुसार हा निधी वितरितही करण्यात आला आहे़ त्यामध्ये सोनपेठ नगरपालिकेला दलितेत्तर अंतर्गत १२ लाख ७ हजार तर नगरोत्थानमध्ये ६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ मानवत नगरपालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत ६० लाख रुपये तर दलितेत्तर अंतर्गत ४० लाख आणि गंगाखेड नगरपालिकेला दलितेत्तर योजनेंतर्गत ६० लाख तर नगरोत्थान योजनेंतर्गत ४० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे़
सेलू नगरपालिकेला नगरोत्थान अंतर्गत ४८ लाख तर दलितेत्तर योजनेंतर्गत ५६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत़ पाथरी नगरपालिकेला दलितेत्तर योजनेंतर्गत ३५ लाख, नगरोत्थान योजनेंतर्गत १० लाख तर युडी-६ योजनेंतर्गत ३५ लाख रुपये वितरित करण्यता आले आहेत़ जिंतूर नगरपालिकेला दलितेत्तर योजनेंतर्गत ४० लाख, नगरोत्थान योजनेंतर्गत १० लाख तर युडी-६ योजनेंतर्गत ३९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ पूर्णा नगरपालिकेला युडी-६ अंतर्गत ६० लाख, नगरोत्थान योजनेंतर्गत ५० लाख आणि दलितेत्तर योजनेंतर्गत ७५ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे़
वितरित करण्यात आलेल्या निधीमधून रस्त्यांची दुरुस्ती, नाली बांधकाम, नवीन रस्ते तयार करणे, रस्ता दुभाजक तयार करणे आदी कामे करण्यात येणार आहेत़ जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी नगरपालिकांना देण्यात आला असला तरी या निधीतून होणाºया कामांवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांचे लक्ष राहणार आहे़ त्यामुळे करण्यात येणाºया कामांचा दर्जा चांगला राहील, अशी अपेक्षा नागरिकांमधून केली जात आहे़
पुर्णेला सर्वाधिक निधी
पूर्णा नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निधी वितरित करताना या पालिकेला झुकते माप दिले आहे़ तब्बल १ कोटी ८५ लाखांचा निधी या पालिकेला देण्यात आला आहे़ सेलू पालिकेला १ कोटी ४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ येथे स्थानिक आघाडीची सत्ता आहे़ याशिवाय शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मानवत पालिकेला १ कोटी आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या गंगाखेड पालिकेलाही १ कोटी रुपये देण्यात आले आहेत़ राष्ट्रवादीच्या ताब्यातील पाथरी व जिंतूर पालिकेला प्रत्येकी ८० व ८८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत़ भाजपाच्या ताब्यात असलेल्या पालम नगरपंचायतीला फक्त २३ लाख ४६ हजार रुपयांचा तर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सोनपेठ पालिकेला फक्त १८ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़