परभणी सामूहिक अत्याचार अन् दरोडा; तपासात पोलिसांची गोपनीयता, आरोपींच्या शोधात ९ पथके
By राजन मगरुळकर | Updated: January 4, 2025 19:27 IST2025-01-04T19:26:19+5:302025-01-04T19:27:21+5:30
पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला.

परभणी सामूहिक अत्याचार अन् दरोडा; तपासात पोलिसांची गोपनीयता, आरोपींच्या शोधात ९ पथके
परभणी : तालुक्यातील पारवा शेतशिवारामध्ये शुक्रवारी झालेल्या सामूहिक अत्याचार आणि दरोडा प्रकरणात जिल्हा पोलिस दलाने आरोपींच्या शोधासाठी नऊ पथकांची निर्मिती केली. ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या प्रकरणात शुक्रवारी रात्री उशिरा परभणी ग्रामीण ठाण्यात अनोळखी पाच इसमांविरुद्ध विविध कलमांन्वये दरोडा आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. या घटनेत पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील पती, सासू असे तिघेजण घरामध्ये असताना मध्यरात्री अज्ञात पाच जणांनी प्रवेश करून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारून जखमी केले, तसेच फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. फिर्यादीच्या नातवाचे घरातील बॅगमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले. याशिवाय सासूला काठीने मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. संबंधित घटनेनंतर फिर्यादी, त्यांची सासू व पती यांना खोलीत बंद करून खोलीला बाहेरून कुलूप लावून हे सर्व आरोपी निघून गेले. नंतर बराच काळ हे तिघेही घरातील खोलीमध्ये जखमी अवस्थेत पडले होते. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
फिर्यादीच्या पतीची तब्येत अजूनही गंभीर
पीडित फिर्यादी महिलेच्या पतीला खासगी दवाखान्यात उपचारास दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजून गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल लांबविला
फिर्यादीचे, फिर्यादीच्या नातवाचे, सासूचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण दोन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबविला आहे. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३१० (२), ३११, ६४ (एल), ७० (१), ३३३, ३५१ (३) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत.
तो कोठे आहे, म्हणत केला घरात प्रवेश...
या घटनेमध्ये अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या पतीस एक इसम (तो) कोठे आहे, आम्हाला त्याला मारायचे आहे, असे म्हणून प्रवेश केला. यानंतर एका इसमाने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यात जोराने मारून जखमी केले. शिवाय फिर्यादीचा पती आणि सासू यांनाही या दरोडेखोरांनी गंभीर मारहाण केली. आता घटनेतील फिर्यादीप्रमाणे त्या व्यक्तीचा उल्लेख कशासाठी व कोणत्या कारणांनी केला याचा तपास सुरू आहे.
नऊ पथकांकडून शोध
पोलिस यंत्रणेकडून घटनेचा गंभीरतेने तपास सुरू आहे. सर्व प्रकारे सखोल चौकशी, तपासणी आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस पथक भेट देऊन आरोपींचाही शोध घेत आहेत. सर्व प्रकरणाच्या तपासासाठी एकूण नऊ पथके स्थापन केली आहेत.
- रवींद्रसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक