परभणी : गंगाखेड, जिंतूर, पूर्णेत दुष्काळ नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:33 AM2018-11-01T00:33:38+5:302018-11-01T00:34:09+5:30
जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़
राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळासृदश्य परिस्थिती जाहीर केली होती़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यांत गंभीर तर परभणी, पालम व सेलू तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले होते़ आता केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले़ त्यामध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची सत्यमापन समितीकडून तपासणी करण्यात आली़ त्यातील निष्कर्षानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने राज्यातील १८० तालुक्यांपैकी २९ तालुके या यादीतून वगळले आहेत़ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांपैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा तर २९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़
या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर या तीन तालुक्यांचा समावेश होईल, असे वाटले होते; परंतु, या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३१ आॅक्टोबरच्या आदेशानुसार निराशा झाली आहे़ यापूर्वी मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले परभणी, पालम व सेलू हे तीन तालुके आता गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत़ या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, पेरणीचे क्षेत्र व पिकांची स्थिती आदी बाबींचा अभ्यास करून तालुक्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत़
सुधारित हंगामी पैसेवारीचा कौल गंगाखेड, जिंतूरच्या बाजुने
४महसूल विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या परभणी तालुक्याची पैेसेवारी ४४ पैसे, पालम ४० पैसे, पाथरी ४२.५७ पैसे, सोनपेठ ४३.९२, मानवत ४२.४९, सेलू ४६ पैसे अशी आहे. तर गंगाखेड तालुक्याची ४३.७९ व जिंतूर तालुक्याची ४७ पैसे सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित झाली आहे. या दोन्ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून या संदर्भात सुधारित निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्णा तालुक्यात मात्र महसूलच्या अहवालानुसार ९४ ते ९५ टक्के पाऊस झाल्याने ५४.२५ पैसे सुधारित पैसेवारी आली आहे. त्यामुळे हा तालुका सध्या तरी दुष्काळ जाहीर होण्यापासून बराच दूर आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर दुष्काळाची खरी परिस्थिती जाहीर होणार आहे.
४७९ गावांना सवलती
४दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७९ गावांना दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १११, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० व सेलू तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे़
४या ४७९ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कर्जाचे पूनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामात शिथिलता, आवश्यक तेथे पाण्याच्या टँकरचा वापर व दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांंनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.