परभणीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन घरांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:14 PM2018-12-03T16:14:07+5:302018-12-03T16:17:09+5:30
शहरातील स्वच्छता कॉलनी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन घरे जळून खाक झाली.
परभणी : शहरातील स्वच्छता कॉलनी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन घरे जळून खाक झाली. आज ( दि. ३) दुपारी २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
शहरातील वांगी रीड भागात स्वच्छता कॉलनीत कैलास विठ्ठलराव वाघमारे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा दुपारी २.४५ च्या सुमारास अचानक स्फोट झाला. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नव्हते. कैलास वाघमारे हे कामानिमित बाहेर गेले होते. घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ झाली. दरम्यान, याच घराला लागून असलेल्या सचिन आडोदे यांच्या घरालाही आगीने पेट घेतला. आडोदे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस पार्टीशनच्या दोन खोल्या आहेत. त्यास आग लागल्याने आडोदे कुटुंबातील सदस्य घरबाहेर पडले. आडोदे यांनी तातडीने घरातील सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टाळला.
अग्नी शामक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करीत आगीवर नियंत्रण मिळविले. घराशेजारी असलेल्या इतर घरांमधून सुमारे सात सिलिंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे आग लागलेल्या घरात इतर दोन रिकामे सिलिंडर होते तेही अग्नी शामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. दुपारी ४ वाजेपर्यंत मदतकार्य सुरू होते. या घटनेत दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेनंतर रेझ आवटे, अनिल ढेम्बरे, इकबाल पठाण, रवि सोनकांबळे आदींनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले.