परभणी : आंदोलनांनी गाजला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:47 AM2018-10-02T00:47:11+5:302018-10-02T00:47:23+5:30
रेशन धान्य मिळत नसल्याने तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटीमुळे अन्याय झालेल्या नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. विविध गावांतील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा हा आढावा...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रेशन धान्य मिळत नसल्याने तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटीमुळे अन्याय झालेल्या नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. विविध गावांतील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा हा आढावा...
राणीसावरगाव येथील सरपंचाविरुद्ध उपोषण
परभणी- गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी स्वराज्य महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ आॅक्टोबरपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. राणीसावरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये गैरप्रकार झाला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे, पुरावे दाखल करुनही कारवाई होत नसल्याने स्वराज्य महिला संघटनेच्या वतीने उपोषणास सुरुवात केली आहे. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिताताई गुट्टे, शकुंतला नागरगोजे, तानाजी गुट्टे, सुधाकर कापसे आदींनी हे उपोषण सुरु केले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकास निलंबित करावे, ग्रामपंचायतीच्या पाच वर्षाच्या बजेटची माहिती द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
रेशनसाठी पेडगावच्या लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
स्वस्तधान्य दुकानातून रेशन मिळत नसल्याने तालुक्यातील पेडगाव येथील लाभार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अर्धातास ठिय्या मांडला. जिल्हाधिकाºयांनी लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पेडगाव येथील रेशन दुकानदार जुलै महिन्यापासून रेशनचे धान्य देत नाही. आॅनलाईन कार्ड नोंदणी झाली नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालयात अर्ज दिला. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी तालुका पुरवठा अधिकारी पेडगाव येथे आले. त्यांनी ज्यांच्या पावत्या निघेल त्यांना रेशन द्या, असे सांगितले. ६० टक्के लाभार्थ्यांच्या पावत्या निघाल्या; परंतु, दुकानदाराकडे रॉकेल आणि तूरदाळ नसल्याने ३० टक्के लाभार्थ्याना धान्य मिळाले नाही. उर्वरित ४० टक्के लाभार्थ्यांचे आधारलिंक नसल्याने रेशन मिळणार नसल्याने दुकानदार व पुरवठा अधिकाºयांचे म्हणणे आहे. प्रशासकीय कारवाईमुळे लाभार्थी रेशनपासून वंचित राहत असून लाभार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. जिल्हाधिकाºयांनी लाभार्थ्यांची भेट घेतली. एक- दोन दिवसांत प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिल्यानंतर लाभार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
उमरा येथील ग्रामस्थांचे उपोषण
परभणी- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रपत्र ड भरताना भेदभाव केल्याने पाथरी तालुक्यातील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करुन प्रशासनाकडे दाद मागितली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र असतानाही वंचित ठेवले जात आहे. या योजनेंतर्गत सर्व्हेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेतले जात आहे; परंतु, गावातील २९१ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यास ग्रामसेवकाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेपासून लाभार्थी वंचित राहत असून न्याय द्यावा, या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. डॉ.राजेंद्र कोल्हे, संजय कोल्हे, कोंडिबा कोल्हे, अंगद कोल्हे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.