परभणी : गोंधळातच आटोपली सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:37 AM2018-08-15T00:37:10+5:302018-08-15T00:38:16+5:30
जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकी भवनात १४ आॅगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेस बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ तान्हाजी मुटकुळे, लक्ष्मणराव दुधाटे, बालाजी देसाई, विजयसिंह जामकर, हेमंतराव आडळकर, भगवान सानप यांच्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते़
संचालक सुरेश वरपूडकर यांनी बँकेच्या ठेवी, उचल, कर्ज आदीची माहिती दिली़ त्यानंतर पीककर्जाचा विषय शेतकरी सभासदांनी उपस्थित केला. काही सभासदांनी नवीन पीक कर्ज वाटप करताना रेडीरेकननुसार वाटप करणार का, असा सवाल केला़ या प्रश्नावर संचालक मंडळ व बँक प्रशासन उत्तर देण्यास पुढे आले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांनी गोंधळ सुरू केला़ त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता़
संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी सभासदांना समजविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गोंधळ थांबत नसल्याने ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.