परभणी : कोनेरवाडी गावाला रस्ता मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:20 AM2019-02-14T00:20:42+5:302019-02-14T00:21:53+5:30
तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़
पालम तालुक्यातील कोनेरवाडी हे १०० ते १२५ घरांचे छोटेशे गाव आहे़ हे गाव मागील वर्षी देशात चर्चेत आले होते़ देशसेवा करताना या गावातील वीरपूत्र शुभम मुस्तापुरे शहीद झाले होते़ या शहीद जवानाला अखेरच्या निरोप देण्यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व हजारो देशप्रेमी नागरिक गावात दाखल झाले होते़ त्यानंतर या गावाचा विकास होईल, अशी आशा होती; परंतु, प्रशासनाकडून गावाच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे़ गावाला जाण्यासाठी ६ किमीचा रस्ता असून, हा रस्ता पूर्णत: खराब झालेला आहे़ पावसाळ्यात तर चिखल तुडवित ग्रामस्थांना हा रस्ता पार करावा लागतो़ रस्त्याअभावी गेल्या वर्षी एका महिलेचा मृत्यूही झाला होता़
ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे केली आहे़ यावेळी सरपंच सरूबाई मुस्तापुरे, उपसरपंच मीरा राठोड, भागवत मुस्तापुरे, हनुमान मुस्तापुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़