परभणी : निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:20 AM2019-04-15T00:20:21+5:302019-04-15T00:20:26+5:30
निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना प्रशिक्षणासह निवडणूक कामासाठी घरातून, कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभेच्या सार्वजनिक व पोट निवडणुकीसाठी हा नियम लागू राहणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या अधिकारी, कर्मचाºयांच्या वारसांना १५ लाख रुपये, अतिरेकी अथवा नक्षलवाद्यांच्या कारवाईत हल्ला होऊन मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना ३० लाख रुपये, अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये तर अतिरेकी कारवायांमध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.