परभणी : पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:58 AM2019-05-07T00:58:51+5:302019-05-07T00:59:22+5:30
तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे
सुभाष सुरवसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गोदावरीला पुर येत असे. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील मोठमोठे डोह भरुन संपूर्ण उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून रहात होती. त्यामुळे गोदाकाठासह परिसरातील शेतकरी ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफुल, हरभरा आदी पिके घेत असत. उन्हाळ्यात देखील गोदाकाठचा परिसर हिरवागार राहत होता; परंतु, पाच वर्षांपासून सोनपेठ तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. विहीर व बोअरची अनुक्रमे ३० ते १५० फुटावर असलेली पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, पाझर तलाव, बंधारे, शेततळे आदी पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत. बारमाही पाण्याचा खळखळाट ऐकू येणाºया गोदावरीला सुद्धा आता उतरती कळा लागली आहे. गोदावरीतील मोठमोठ्या डोहांना मार्च महिन्यातच कोरड पडली होती. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना आता पाणीटंचाईचा समाना करावा लागत आहे. बागायती शेतीला आता वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे़
गोदापात्रातील विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली
४सोनपेठ शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांचा पाणीप्रश्न गोदावरीवर अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. सध्यस्थितीत गोदाकाठच्या अनेक विहीर व बोअरची पाणीपातळी खालावली आहे़
४गोदाकाठच्या बाजुच्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांचा वावर होता; परंतु, आज पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी ईतरत्र स्थलांतरीत होत आहेत.
४एकंदरीत आजची परिस्थीती पहाता सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाचे पार वाळवंट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
जनावरांचे हाल
४गोदावरी नदी कोरडी पडल्याने मुक्या जनावरांचेही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़ विशेषत: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे़ शेतशिवारांत पाण्याच्या ठिकाणी फिरत असताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांच्यासाठी पानवठे करण्याची मागणी होत आहे़
या गावांमध्ये : केले अधिग्रहण
४तालुक्यातील वंदन, तिवठाना, शेळगाव, आवलगाव, वडगाव स्टे., पोहंडूळ, पारधवाडी, लोकरवाडी या ८ गावांमध्ये १४ विहीर अधिग्रहण व उंदरवाडी, वैतागवाडी, पारधवाडी, नखतवाडी या ४ वाडी तांड्यावर ५ विहिरींचे अधिग्रहण केले असून नरवाडी आणि कोठाळा येथे दोन टँकर चालू आहेत.
४मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी अख्खा दिवस घालावा लागत आहे़ त्यामुळे इतर कामे केव्हा करावीत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़