परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:25 AM2019-08-12T00:25:33+5:302019-08-12T00:25:59+5:30

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.

Parbhani: Godavari likely to release water | परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अर्धा पावसाळा सरला तरी एकाही नदीला पूर आला नाही. कुठेही पूर परिस्थिती नसली तरी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात दररोज पाण्याची आवक सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी जायकवाडी प्रकल्पामध्ये ६३ हजार ६६ क्युसेस पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पामध्ये २५२९.४८६ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून ८२.५१ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पुढे सोडण्याची शक्यता आहे.
धरणातून केव्हाही गोदावरी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते. हे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यानंतर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तसेच या काळात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर दवंडी देऊन पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवकांना गावात थांबण्याचे सूचित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर एकूण काठावरील गावांपैकी साधारणत: ११८ गावांना पुराची शक्यता निर्माण होते. केव्हा तरी पूर येणाऱ्या गावांची नोंद निळ्या रेषेखालील गावे म्हणून केली जाते, अशी २७ गावे आहेत. तर अधिक वेळा पूर येणाºया गावांची संख्या ९१ एवढी आहे.
डाव्या कालव्यातून २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग
४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यामध्ये पोहचणार आहे. जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.
४त्या पार्श्वभूमीवर ११ आॅगस्टपासून २०० क्युसेस पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर अनेक भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी पाथरी, मानवत तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.
४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा पूर्णत: कोरडा असून मानवत तालुक्यातील ०.०१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या दोन तालुक्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णीक विद्युत केंद्रालाही पाणी दिले जाईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सलगरकर यांनी दिली.
बचाव साहित्य आणि पथके सज्ज
४पूर परिस्थिती निर्माण झालीच तर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी त्या त्या गावातील बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तहसील कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले जीवनरक्षक जॅकेट, कटर, दोरी, बोट आदी साहित्यही सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करुन घेतली जात आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली.
गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असल्याने सर्व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना नदीकाठावरील गावांना पूर्व सूचना द्याव्यात. तसेच सतर्क रहावे, अशा सूचना दिल्या आहेत.
-अंकुश पिनाटे,
निवासी उपजिल्हाधिकारी
पूर्णा तालुक्यात १२ गावे
४पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीकाठावर एकूण १२ गावे असून जायकवाडी धरणातील पाणी या गाव परिसरात कधीही पोहचू शकते. त्यामुळे या गावांमध्येही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार शाम मदनूरकर यांनी दिली.

Web Title: Parbhani: Godavari likely to release water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.