परभणी : शासकीय कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:12 AM2018-08-08T00:12:32+5:302018-08-08T00:13:40+5:30
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर गेले असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शासकीय ७४ संवर्गामधील १५ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दिवसभरात शासकीय कामकाज ठप्प पडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारीकर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर गेले असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शासकीय ७४ संवर्गामधील १५ हजाराहून अधिक कर्मचारीसंपात सहभागी झाल्याने दिवसभरात शासकीय कामकाज ठप्प पडले होते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता आणि थकबाकी अदा करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, महिला अधिकारी- कर्मचाºयांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा लागू करावी, अधिकारी-कर्मचाºयांना होणाºया मारहाणीसंदर्भात परिणामकारक कायदा करावा आदी ३१ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ७४ संवर्गामधील विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी सहभाग नोंदविला आहे.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. आपल्या मागण्या संदर्भात घोषणाबाजी करुन संपात सहभाग नोंदविला. परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग, लिपीक, तलाठी, शासकीय रुग्णालयांमधील लिपीक, नर्स, कृषी कार्यालयातील कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासकीय दुध डेअरी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक आदी विभागातील कर्मचाºयांनी संपात सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनातील कर्मचाºयांसह जिल्हा परिषदेतील कर्मचारीही मंगळवारी संपामध्ये सहभागी झाले होते. सुमारे १५ हजार कर्मचारी संपात उतरल्याचा दावा संघटनांच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस पडली होती. अनेक महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये एरव्ही दिसणारी गर्दी मंगळवारी गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवसभरात शासकीय कामकाज ठप्प पडले होते.
अत्यावश्यक सेवा सुरू
राज्य कर्मचाºयांच्या संपादरम्यान आरोग्य विभागातील अत्यावश्यक सेवा सुरु ठेवली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपीकवर्गीय कर्मचारी संपात सहभागी होते. मात्र कंत्राटी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी मात्र सेवेत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद असला तरी अंतररुग्ण विभागात कामकाज सुरु होते.
शिक्षकेतर कर्मचारी संपात
तीन दिवसांच्या संपामध्ये शिवाजी महाविद्यालयातील कर्मचारी संघटनेनेही सहभाग नोंदविला. अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील सर्व कर्मचाºयांनी मंगळवारी संपात सहभाग नोंदविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर लोणीकर, एकनाथ देवकर, डी.के. बल्लाळ, रवींद्र तिळकरी, कंठाळकर, विलास गिराम, बाळकृष्ण कोकडकर, रमेश खिस्ते, रामभाऊ रेंगे आदी उपस्थित होते.
दीड हजार : जिल्हा परिषद कर्मचारी संपात सहभागी
जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने ७ आॅगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. जिल्हा परिषदेतील विविध १२ विभागांमधील सुमारे दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती संघटनेने दिली. जिल्हा परिषदेमधील राज्य जि.प. कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी, आरोग्य सेवा कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी संघटना, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, पशू चिकित्सा व्यवसाय कर्मचारी, हिवताप निर्मूलन, कास्ट्राईब कल्याण महासंघ आदी संघटना संपात सहभागी झाल्या होत्या.
तालुकास्तरावरील कामकाजही ठप्प
जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर या तालुक्यांमध्येही शासकीय कर्मचाºयांनी संपामध्ये सहभाग नोंदविल्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. गंगाखेड येथे कर्मचाºयांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मानवत येथे कर्मचाºयांनी निदर्शने करुन तहसीलदार निलम बाफना यांना मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपात सहभागी कर्मचारी
जिल्हाधिकारी कार्यालय : ४४९
नायब तहसीलदार : ००६
वाहनचालक : ०११
अव्वल कारकून : ०९८
मंडळ अधिकारी : ०३९
लिपीक १६०, तलाठी २३९,
शिपाई ११८, कोतवाल २३७