परभणी: खंडाळीतील ग्रामस्थांचा ग्रामसेवकास घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:42 PM2019-04-02T23:42:50+5:302019-04-02T23:42:59+5:30
तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.
तालुक्यातील खंडाळी येथील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मागणीचा ठराव घण्यात आला. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीने पंचयात समितीकडे प्रसव दाखल केला. त्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. मात्र २ महिने उलटूनही टँकर सुरु झाले नसल्याने संतापलेल्या महिला व ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गावात आलेले ग्रामसेवक एम.व्ही. नवटके यांना जाब विचारला. त्यानंतर ग्रामसेवक नवटके यांना घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. ही माहिती पंचायत समितीला मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी भ्रमणध्वनीवरुन खंडाळी ग्रामस्थांशी संवाद साधला. लवकरच टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकाची सुटका केली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तराव पवार, राजाराम पवार, सरपंच मोतीराम कोल्हे, कोंडिबा जंगले, माजी सरपंच सदाशिव भोसले, नितीन पवार, गंगाराम भोसले, बाबुराव भोसले, रामकिशन जंगले, सखाराम जंगले, अंजनाबाई माळवे, रंभाबाई हासले, वैशाली जंगले, छायाबाई जंगले, सुशिला जंगले, संगिता पवार, सागरबाई कोल्हे, मुक्ताबाई कोल्हे, जनाबाई भोसले, राधाबाई भोसले, भगवान भोसले, नारायण भोसले, बाळू सूर्यवंशी, राम कोल्हे, श्रीरंग भोसले, माधव सूर्यवंशी आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.