परभणी : शेतकऱ्यांना ४६ कोटी ८५ लाखांची अनुदान भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:23 AM2018-11-03T00:23:21+5:302018-11-03T00:23:27+5:30
मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झाल्याने बाधित शेतकºयांना ही दिवाळीची भेट ठरली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झाल्याने बाधित शेतकºयांना ही दिवाळीची भेट ठरली आहे़
परभणी जिल्ह्यामध्ये २०१६-१७ च्या खरीप हंगामात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती़ कापूस बोंडे लागण्याच्या अवस्थेत असतानाच या पिकावर बोंडअळीचा हल्ला झाला़ पाहता-पाहता जिल्ह्यातील संपूर्ण कापूस बोंडअळीने बाधित झाले़ त्यामुळे शेतकºयांना कापसाच्या उत्पादनापासून वंचित रहावे लागले होते़ जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर राज्य शासनाकडे ३ लाख ५१ हजार शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी नोंदविली होती़ जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने कापूस उत्पादकांना ३ टप्प्यात नुकसानीचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला़ या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या व दुसºया टप्प्यात १०५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी शेतकºयांना वितरित करण्यात आला़ मात्र तिसºया टप्प्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने शेतकरी अनुदानाच्या रकमेपासून वंचित होते़ जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्याचे अनुदान वितरित करण्यासाठी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार ७५२ रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदवूनही अनुदान मिळत नसल्याने तिसºया टप्प्यातील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित राहिले होते़ दोन महिन्यांपासून या अनुदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता़ शेतकºयांची ओरडही वाढली होती़ त्यातच पावसाने पाठ फिरविली़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने शेतकरी बोंडअळीच्या अनुदानावर भरोसा ठेवून होते़ दरम्यान, दिवाळीपूर्वीच हे अनुदान प्राप्त झाले असून, जिल्हा प्रशासनाने तहसीलनिहाय बोंडअळीच्या तिसºया हप्त्यापोटी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार ७५२ रुपये वितरित केले आहेत़ त्यामुळे या अनुदानावर शेतकºयांचा दिवाळी सण आनंदात जाईल, अशी अपेक्षा आहे़
परभणी तालुक्याला : सर्वाधिक रक्कम
४बोंडअळीच्या अनुदानापोटी परभणी तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे पैसे रखडले होते़ जिल्हा प्रशासनाने परभणी तहसीलसाठी ८ कोटी ६० लाख ८ हजार ८६ रुपये वितरित केले आहेत़ सेलू तालुक्यासाठी ८ कोटी २५ लाख १२ हजार ८२ रुपये, जिंतूर ८ कोटी ४ लाख २६ हजार ८२ रुपये, पाथरी ५ कोटी २८ लाख १० हजार २९३ रुपये, मानवत ६ कोटी ६६ लाख ४४ हजार २६० रुपये, सोनपेठ ३ कोटी ५३ लाख २ हजार ९०५ रुपये, पालम ३ कोटी ८० लाख ४९ हजार ७५ रुपये आणि पूर्णा तालुक्यासाठी २ कोटी ६८ लाख १६ हजार ९६९ रुपये वितरित करण्यात आले आहेत़
गंगाखेड तालुक्यासाठी या निधीतून बोंडअळीचे अनुदान वितरित करण्यात आले नाही़ या तालुक्यामध्ये बाधित सर्व शेतकºयांना अनुदानाची रक्कम वितरित झाल्याने या निधीतून गंगाखेड तालुका वगळण्यात आला आहे़
सव्वा लाख शेतकºयांना होणार फायदा
जिल्ह्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी तिसरा हप्ता रखडल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते़ ३ लाख ५१ हजार शेतकºयांना अनुदान वितरित करावयाचे असून, आतापर्यंतच्या दोन टप्प्यामध्ये २ लाख १६ हजार शेतकºयांच्या खात्यावर १०५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे़ तिसºया टप्प्यामध्ये १ लाख ३५ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित होते़ जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाकडे वितरित केल्याने या रकमेतून सव्वा लाख शेतकºयांच्या खात्यावर बोंडअळीच्या तिसºया टप्प्याचे अनुदान दिले जाणार आहे़