परभणी : जांभुळबेट रस्त्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:03 AM2019-06-11T00:03:25+5:302019-06-11T00:04:10+5:30
तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे हे बेट मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. जांभूळबेटाकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने पर्यटकांनी बेटाकडे पाठ फिरवली होती. जांभुळबेट रस्त्यावर ३ कि.मी. पर्यंतचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित २.५ कि.मी. रस्ता हा अजूनही ‘जैसे थे’ असून या कामासाठी आता प्रादेशिक पर्यटन निधी अंतर्गत २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला. याच रस्त्यावरील पालम शहरापासून अर्धा कि.मी. अंतरावरील लेंडी नदीच्या पात्रात जुना पूल असल्याने ७ गावांचा पावसाळ्यात ८-८ दिवस नेहमीच संपर्क तुटत होता. या निधीतून पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पुलाच्या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे जांभूळबेटाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. रस्ता व पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तयार करून पुढील कार्यवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवले आहेत.
लेंडी नदीचा प्रश्न लागला मार्गी
जांभूळबेटाकडे जाणाºया रस्त्यावर लेंडी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी या मार्गावरील वाहतूक बंद होत होती़ त्यामुळे पर्यटकांस ग्रामस्थांची गैरसोय होत होती.
या पुलाच्या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे या पुलाचे काम मार्गी लागणार असून, पुलाची उंची वाढल्यास परिसरातील ५ गावांचा प्रश्न निकाली निघणार आहे.
काम दर्जेदार होण्याची गरज
जांभूळबेटाकडे जाणाºया रस्ते व पुलाच्या कामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ परंतु, ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़