परभणी: अवकाळी पाऊस अन् गारपिटीने मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:20 PM2020-03-18T23:20:19+5:302020-03-18T23:20:42+5:30
जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
गंगाखेड शहरासह परिसरात सायंकाळी ५ वाजता वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली़ सायंकाळी ६ वाजता हलक्या सरळी कोसळल्या़ त्यानंतर महातपुरी, रुमणा, जवळा, सुनेगाव, धारासूर, मैराळ सावंगी आदी भागांत जोरदार पाऊस झाला तर दुसलगाव, खळी, खळी पुनर्वसन, ब्रह्मनाथ वाडी, चिंच टाकळी, गौंडगाव आदी भागात जोरदार गारपीट झाली़ या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका इ. पिकांचे नुकसान झाले आहे़
पूर्णा तालुक्यात बुधवारी सायंकाळी ६़३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ चुडावा, एरंडेश्वर, वझूर, कावलगाव, गौर, ताडकळस आदी भागात हा पाऊस सुरू झाला़ त्यानंतर फुलकळस, लिमला इ. भागांत गारपीट झाली़ या गारपिटीमुळे आंब्याच्या कैऱ्या गळून गेल्या असून, इतर पिकांचेही नुकसान झाले आहे़ सोनपेठ तालुक्यातील डिघोळ परिसरातही सायंकाळी ६ च्या सुमारास १० ते १५ मिनिटे गारपीट झाली़ आलेगाव व परिसरात सायकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली़ दिवसभर ढगाळ वातावरण होते़ सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली़ अर्ध्या तासाच्या पावसाने रबी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे़
दरम्यान, सेलू शहर व परिसरात मंगळवारी रात्री ९.४५ च्या सुमारास अवकाळी पाऊस सुरु झाला. मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. रात्री सेलू शहर व परिसरात ८ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद झाली आहे. याशिवाय देऊळगाव मंडळात ३, कुपटा मंडळात ४, वालूर मंडळात २ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात चिकलठाणा महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे ३० मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यात सरासरी ९.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी शहरात २ मि.मी. तर परभणी ग्रामीण महसूल मंडळात ४ मि.मी., पेडगाव मंडळात ५.६० तर जांब मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.११ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिंतूर महसूल मंडळात २, सावंगी म्हळसा मंडळात ४, चारठाण्यात ३ तर बामणी मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ३ तालुक्यांत सरासरी १.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. शेतात सध्या ज्वारी, गहू काढणीचे काम सुरु आहे. त्यामुळे या पावसामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसणार आहे.
चिकलठाणा मंडळात जोरदार पाऊस
४सेलू : तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळात मंगळवारी मध्यरात्री १० च्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ महसूल विभागाकडे याची ३० मिमी नोंद झाली आहे़ चिकलठाणा व परिसरात सध्या रबी हंगामातील ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी पिकांची काढणी करून त्याची गंजी रचून ठेवण्यात आली आहे़
४मंगळवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अचानक झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेले हे पीक भिजले आहे़ तर शेतामध्ये उभी असलेली ज्वारी व गव्हाचे पीक आडवे झाले आहे़ चिकलठाणा शिवारातील रायपूर, निरवाडी बु़, खु़, वाई, बोध, केमापूर इ. गाव शिवारातील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे़ त्यामुळे या पिकाची प्रतवारी कमी करण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संदर्भात तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवारी रात्रीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही; परंतु, या अनुषंगाने पाहणी करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले असल्याचे शेवाळे म्हणाले़