परभणी :दु:ख माणसाला संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतात- समाधान महाराज शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:00 AM2019-05-16T01:00:38+5:302019-05-16T01:00:52+5:30
जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी (नृसिंह) (जि. परभणी): जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.
श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सवानिमित्त आयोजित नृसिंह पुराण कथेप्रसंगी समाधान महाराज शर्मा बोलत होते.
ते म्हणाले, मार्कण्डेय ऋषीची आई असो वा आपली आई जगामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. ती स्वत: कितीही दु:ख सहन करील, मात्र आपल्या लेकराला सुख देण्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे आई सारखे दु:ख झेलणारे कोणीही नाही, असे त्यांनी सांगितले. आजच्या घडीला मानवाचे विकृतीकरण होत आहे. मानव दानव होण्याच्या मार्गावर असून ही मानवाची हार आहे. मानवाची ही विकृती थांबायला पाहिजे, असे महाराज म्हणाले. या कथेप्रसंगी यम, यमी आणि मार्कण्डेय यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. कथेचे संगीत संयोजन संतोष शर्मा यांनी केले.
या कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. नृसिंह पुराण कथा झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोखर्णी येथील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
नृसिंह पुराण कथेने भाविक मंत्रमुग्ध
४श्री नृसिंह पुराण कथेमध्ये विविध अवतारांचे वर्णन करताना ह.भ.प. समाधान महाराज शर्मा हे ओघवत्या शैलीत कथा निरूपण करीत आहेत. कथाश्रवणाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. संगीत सहाय्यक कथेच्या प्रसंगानुरूप संगीत देत असल्याने कथा अधिक प्रभावी होत आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालत कथा निरुपण केले जात आहे.
४ याप्रसंगी सिंथेसायझरवर संतोष शर्मा, बासरी समाधान महाराज चोपडे, पखवाज सिद्धेश्वर महाराज निळे, ढोलक व पैड शुभम देवाडकर, तबला शिवाजी आरदड, संगीतसाथ गोविंद महाराज नाईकवाडे हे साथसंगत करीत आहेत. किर्तीशकुमार वैष्णव यांनी देखावा साकारला. भिकूलाल पुनपालिया व अलका पुनपालिया हे कथेचे यजमान आहेत.
४ १६ मे रोजी ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे दिंद्रुडकर यांचे रात्री ९ वाजता कीर्तन होणार आहे.