परभणी :मराठवाड्यासह विदर्भात जिंतुरातून गुटखा तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:14 AM2018-10-19T00:14:16+5:302018-10-19T00:15:40+5:30

शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत.

Parbhani: Gutkha smuggled from Marathwada region in Vidarbha | परभणी :मराठवाड्यासह विदर्भात जिंतुरातून गुटखा तस्करी

परभणी :मराठवाड्यासह विदर्भात जिंतुरातून गुटखा तस्करी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत.
तालुक्यात राजरोसपणे गुटखा व्यवसाय होत असून, तो आता चांगलाच फोफावला आहे. जिंतूर शहरातील ५५ पानटपऱ्या, २०० किराणा दुकाने, २० हॉटेलवर बंदी असलेला गुटखा सर्रास मिळतो. विशेष म्हणजे, दामदुप्पट दराने हा गुटखा विक्री केला जातो. गुटखा विक्रेत्यांचे जाळे शहरापुरते मर्यादित राहिले नसून तालुक्यातील १७० गावांत गुटखा पोहचविला जातो. यासाठी स्वतंत्र वाहन वापरत असून जवळील खेड्यात मोटारसायकलवरून गुटखा पुुरविला जातो. विशेष म्हणजे, गुटख्याची वाहतूक रात्रीच्या वेळी केली जाते.
गुटखा माफियांनी तालुक्यात बस्तान मांडले असून, जिंतूर व परिसरात तीन गोदाम बांधले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचा माल साठविला जातोे. जिंतूर येथून परभणी, जालना, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यात गुटखा पुरवठा होतो. त्याचबरोबर विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची येथूनच वाहतूक केली जाते. अन्न व औषध विभाग, पोलीस प्रशासनासह राजकीय वरदहस्त असल्यानेच गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गुटखा विक्रीला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.
बनावट : गुटख्याचे वाढले प्रमाण
जिंतुरातून पुरवठा होणारा ८० टक्के गुटखा हा बनावट असून तो जिंतूर व परिसरात असलेल्या फॅक्टरीतून आणला जातो. हा गुटखा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. विशेष म्हणजे, यामध्ये लाकडी साल व केमीकल वापरले जाते. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शहातील विविध शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळ परिसरात राजरोसपणे गुटखा विक्री केला जात आहे. याचा परिणाम शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होत आहे. गुटखा विक्री करणाºयांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी टाळत अन्न व औषध विभाग मागील अनेक दिवसांपासून मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करीत आहे. पोलीस प्रशासनही कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुटखा माफियांनी एक प्रकारे पाठबळच मिळत आहे.
जिंतूर तालुक्यात चौका-चौकात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. विशेष म्हणजे, छापिल किंमतीपेक्षा अधिक दराने गुटख्याची विक्री होत असताना कारवाई मात्र होत नाही.
गुटखा विक्री करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. शिवाय परभणीसह इतर जिल्ह्यांचा अतिरिक्त कारभार असल्याने कारवाईलाही पुरेसा वेळ मिळत नाही. तरी पण गुटखामाफियांवर लवकरच कारवाई करू
-सुनिल जयपूरकर,
सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Web Title: Parbhani: Gutkha smuggled from Marathwada region in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.