परभणीत ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:17 AM2019-02-27T00:17:41+5:302019-02-27T00:17:56+5:30
शहरातील एका गोदामासह अन्य तीन दुकानांवर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले असून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील एका गोदामासह अन्य तीन दुकानांवर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले असून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
राज्यात कॅरिबॅग व प्लास्टिक वापरावर बंदी असून कॅरिबॅग आढळल्यास दंड करण्याची तरतूद आहे. शहरातील कोठारी कॉम्प्लेक्स भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याची माहिती उपायुक्त विद्या गायकवाड यांना मिळाली. या माहिेतीच्या आधारे मंगळवारी दुपारी विद्या गायकवाड ह्या कोठारी कॉम्प्लेक्स परिसरात पोहचल्या. त्यानंतर खात्री करुन महापालिकेच्या पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले. या भागातील मॉर्डन प्लास्टिक या दुकानाचे गोदाम बंद होते. दुकान मालकाचा शोध घेऊन त्यास गोदाम उघडण्याचे सूचित करण्यात आले; परंतु, हे गोदाम उघडले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने व्हिडिओ चित्रीकरण करुन गोदामाचे कुलूप तोडले असता आतमध्ये तब्बल ४ ते ५ क्विंटल प्लास्टिक मिळून आले. हे सर्व प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मॉर्डन प्लास्टिक दुकानाच्या मालकाकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर या पथकाने कच्छी बाजार भागातही तीन दुकानांवर कारवाई केली आहे. या तिन्ही दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये या प्रमाणे १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त विद्या गायकवाड यांच्यासह सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विनय ठाकूर, युवराज साबळे, कदम यांनी ही कारवाई केली.