परभणी : एकाच रात्री तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:00 AM2018-10-04T01:00:55+5:302018-10-04T01:01:26+5:30
शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीत एकाच रात्रीत तीन घरे फोडून चोरट्यांनी ४ लाख ६६ हजारांचा ऐवज लांबविला़ ३ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीत एकाच रात्रीत तीन घरे फोडून चोरट्यांनी ४ लाख ६६ हजारांचा ऐवज लांबविला़ ३ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
३ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी तीन घरे फोडल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे़ माळीवाडा भागातील नाईक गल्ली येथील पंकज मोहन नाईक हे २ आॅक्टोबर रोजी शेतातील आखाड्यावर गेले होते़ त्यामुळे त्यांची आई आणि बहिण या दोघी वरच्या मजल्यावर झोपल्या असताना चोरट्यांनी कडीकोंडा तोडून कपाटातील १० तोळे सोने आणि नगदी ८० हजार रुपये असा २ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला़
नाईक यांच्या घराशेजारीच असलेल्या चंद्रसिंग एकनाथ नाईक यांच्या घरातून रोख ७० हजार रुपये आणि १ लाख रुपये किंमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले़ याच भागातील मंगेश लक्ष्मण नाईक यांचे घरही चोरट्यांनी फोडले आहे़ मंगेश नाईक यांच्या घरातून नगदी ६ हजार रुपये चोरीला गेले़ तसेच एक दुचाकीही चोरट्यांनी पळविली़ तिन्ही घटनांत मिळून ४ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे़ माळीवाडा भाग हा सतत गजबजलेला परिसर आहे़ या भागात सहसा चोरीच्या घटना होत नाहीत़ मात्र बुधवारी पहाटे तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे़
दरम्यान, चोरीची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, पोलीस निरीक्षक व्ही़डी़ श्रीमनवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते; परंतु त्यांनाही ठोस अशी काहीही माहिती हाती लागली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.