रिक्त पदांच्या आजाराने ग्रासला परभणी आरोग्य विभाग; प्रभारींवरच चालतोय कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:18 PM2020-11-21T17:18:44+5:302020-11-21T17:21:05+5:30
ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविताना या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकही प्रमुख अधिकारी पूर्णवेळ नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार चालवावा लागत आहे. या विभागाला रिक्त पदाच्या आजाराने ग्रासले असून, पदभरती करण्याच्या शासकीय उपचारांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत येत असलेल्या आरोग्य विभागातून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सांभाळली जाते. ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या विभागात मात्र मागील अनेक वर्षांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्यांचा वाणवा आहे. या विभागाचे प्रमुख पद असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी ही महत्त्वाची पदेच रिक्त आहेत. या सर्व पदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात आहे.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात नियमित आरोग्य सेवेबरोबरच कोरोनाच्या संकटाला रोखण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागले. प्रभारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त जबाबदारी सांभाळत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्याचे काम केले आहे. या काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना रिक्त पदांची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र अद्यापही पदे भरण्यासंदर्भात कारवाई झाली नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणखी सुरळीत करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
वर्ग ३ ची ३४ टक्के पदे रिक्त
आरोग्य विभागात वर्ग ३ ची ६५७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल २२८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचे हे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, वैद्यकीय पर्यवेक्षक आणि युनानी हकिम ही पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांबरोबरच प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही क्षमतेच्या तुलनेत कमी असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविताना या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
संकट काळात कर्मचाऱ्यांनी दाखविली क्षमता
कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ कमी असतानाही आपली क्षमता दाखवून दिली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम असतानाही या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या संकट काळामध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे.
आरोग्य विभागातील रिक्त पदे
जिल्हा आरोग्य अधिकारी १
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी १
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी १
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी १
वैद्यकीय अधिकारी गट अ १३
प्रशासकीय अधिकारी १
सांख्यिकी अधिकारी १
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी १
आरोग्य सेवक ४६
आरोग्य सेविका १२५