परभणी : आरोग्य विभागाला रिक्त पदांचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:49 AM2018-11-19T00:49:18+5:302018-11-19T00:50:44+5:30
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़
सेलू तालुक्यातील देऊळगाव व वालूर या दोन गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ देऊळगाव आरोग्य केंद्रांतर्गत १२ उपकेंद्र आहेत़ देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत़; परंतु, या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ तेही पूर्णा येथील डॉ़दीक्षित यांची या दवाखान्यात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे़ सद्यस्थितीत एकाच डॉक्टरवर दवाखान्याचा भार आहे़ वालूर आरोग्य केंद्रात ३ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत़; परंतु, दोन पदे रिक्त असून, डॉ़ प्रकाश वाटुरे हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत़ देऊळगाव, वालूर या दोन्ही केंद्रांतर्गत १ लाख २२ हजार २५८ लोकसंख्या येते़ त्यांच्या आरोग्यासाठी दोनच डॉक्टर सद्यस्थितीत कार्यरत आहेत़ तसेच आरोग्य सहाय्यकाचे एक पद, आरोग्य सेविकांची पाच पदे, आरोग्य सेवकांचे १२, कनिष्ठ सहाय्यकांची २, परिचरची ३ पदे रिक्त आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे़ मुबलक प्रमाणात औषधी देखील उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़
एक आरोग्य केंद्र दोन उपकेंद्र प्रस्तावित
४आरोग्य विभागाने रवळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर गुळखंड व कवडधन या ठिकाणी उपकेंद्र प्रस्तावित केले आहे़ चिकलठाणा येथील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अंतीम टप्प्यात आहे़ हे नवीन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर दोन केंद्राचा भार कमी होईल, अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी आऱएम़ सोनवणे यांनी दिली़
बोगस डॉक्टर वाढले
४ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा वावर वाढला आहे़ गावांत एक खोली किरायाने घेऊन हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची चर्चा आहे़ या डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ हे बोगस डॉक्टर घरी जाऊन रुग्णांवर उपचार करतात़ शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असल्याची स्थिती आहे़
आयुर्वेदिक दवाखान्याला टाळे
४सेलू तालुक्यातील कुपटा येथील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टर नसल्याने या दवाखान्याला टाळे लागले आहे़ रुग्णालय झाल्यापासून या ठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टर मिळालेले नाहीत़ विशेष म्हणजे, या दवाखान्याबाबत कुपटा येथील ग्रामस्थांनी वारंवार आरोग्य विभागाकडे तक्रारी, निवेदने देऊनही न्याय मिळाला नाही़ त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन तालुक्यात एकमेव असलेला आयुर्वेदिक दवाखाना कायमस्वरुपी सुरू ठेवावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रुग्णांतून होत आहे़