परभणी: मानवतमध्ये जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:58 PM2019-07-07T23:58:18+5:302019-07-07T23:58:26+5:30
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़
जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ अनेकांच्या पेरण्या रखडल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ रविवारी जिल्हाभरात ढगाळ वातावरण होते़; परंतु, काही भागांतच पाऊस झाला आहे़
मानवत तालुक्यात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ संपूर्ण तालुका परिसरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे शहरी भागात रस्त्यावर पाणी साचले होते़ या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओल निर्माण होण्यास मदत होणार आहे़
परभणी शहर आणि परिसरातही रविवारी पावसाने हजेरी लावली़ सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ गंगाखेड तालुक्यात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे़ इतर तालुक्यांत मात्र पावसाने हुलकावणी दिली़
परभणीत सरासरी
२.७८ मि.मी. पाऊस
परभणी : रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पाऊस गायब असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जुलै महिना सुरू झाला तरी पेरणी योग्य पाऊस झाला नाही.
४शनिवारी रात्री काही भागात हलका पाऊस झाला. रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार मानवत तालुक्यात सर्वाधिक ६.३३ मि.मी., परभणी तालुक्यात ५.७३ मि.मी., पालम ०.३३, पूर्णा ४.२०, सेलू १.४०, पाथरी ५ आणि जिंतूर तालुक्यात २ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९१.१७ मि.मी. पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १२१.२५ मि.मी., सोनपेठ तालुक्यात ११५.५० मि.मी., मानवत ११५ मि.मी., पूर्णा ९९ मि.मी., जिंतूर ९३ मि.मी., पालम ९४ मि.मी., परभणी ८३.११ मि.मी., पाथरी ७३ मि.मी. आणि सेलू तालुक्यात ६०.४० मि.मी. पाऊस झाला आहे.