परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:17 AM2019-07-28T00:17:13+5:302019-07-28T00:17:44+5:30
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ताण देण्यास सुुरुवात केली़ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली़ कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली़ जिल्हाभरात पेरणीचे क्षेत्र १०० टक्क्यापर्यंत पोहचले नसले तरी ८४ ते ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाअभावी ही पिके कोमेजत असल्याची स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते़ गावोगावी पावसासाठी देवाला साकडेही घालण्यात आले होते़
अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पावसाला सुरुवात झाली आहे़ शुक्रवारी जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला़ शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी सूर्यदर्शन झाले नाही़ सकाळच्या सत्रात रिमझिम असणारा पाऊस दुपारी मात्र चांगलाच कोसळला़ दुपारी ३़३० वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ अनेक दिवसानंतर रस्त्यावर पावसाचे पाणी वाहताना दिसून आले़ अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली़
शहरासह गंगाखेड तालुक्यात ४़१५ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ पाथरी तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ सोनपेठ, मानवत, पालम, पूर्णा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने या तालुक्यांमधील पिकांना जीवदान मिळाले आहे़ साधारणत: दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ते आजपर्यंत होणाºया अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे़ आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६३़९ टक्के तर मानवत तालुक्यात ६३़५ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत सरासरी २१०़८२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत़ त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे़
पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २९.८० मि.मी., सेलू तालुक्यात २८.२० मि.मी., पाथरी २३.३३ मि.मी., मानवत तालुक्यात २५.३३ मि.मी., जिंतूर तालुक्यात २१.१७ मि.मी., परभणी १९.८८ मि.मी., सोनपेठ : १२ मि.मी., पालम १०.६७ मि.मी. आणि गंगाखेड तालुक्यात केवळ ७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून, आतापर्यंत सरासरीच्या २०.९ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे.