परभणी : पीपल्स बँकेच्या लिलाव प्रक्रियेस उच्च न्यायालयाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:57 PM2019-07-01T23:57:01+5:302019-07-01T23:57:56+5:30
येथील दी परभणी पीपल्स को-आॅप. बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मुख्य इमारतीच्या जागेच्या ई-लिलाव प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील दी परभणी पीपल्स को-आॅप. बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मुख्य इमारतीच्या जागेच्या ई-लिलाव प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
परभणी येथील दी परभणी पीपल्स को-आॅप.बँकेच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील २ हजार ८३२.३७ चौरस मीटर मुख्य कार्यालयाची इमारत, मोकळी जागा ई- लिलावाद्वारे २८ मे रोजी विक्री करण्यात आली होती. १२ कोटी ६ लाख रुपयांना अंतिम बोली सुटली होती.
या लिलाव प्रक्रियेला बीड येथील आर.बी.कन्स्ट्रक्शनचे रोशन बंब यांनी आक्षेप घेतला होता. त्यामध्ये ३ मे रोजी या प्रक्रियेसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर निविदा सूचनेतील अट क्रमांक १२ मध्ये ई-निविदा उघडण्याच्या वेळी जास्तीची बोलीची रक्कम जाहीर करुन आवश्यक असेल तर आवसायक यांच्याकडून इतर निविदाधारकांना बोली करण्याची संधी देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते; परंतु, बँकेचे आवसायक एम.बी.सुरवसे यांनी परस्पर ही अट वगळली. यामुळे सदरील जागेची खुली बोली होऊ शकली नाही. परिणामी आपण १३ कोटी ७१ लाख रुपयांना सदरील जागा व इमारत खरेदी करु इच्छित होतो; परंतु, ही बाब विचारात न घेता सरळसरळ इतरांना फायदा मिळवून देण्यासाठी या प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली, असा आरोप बंब यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर त्यांनी या प्रक्रियेला स्थगिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड.कमलाकर सूर्यवंशी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर २७ जून रोजी न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने या प्रक्रियेस तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली असल्याची माहिती अॅड. कमलाकर सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.