परभणी : गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला सर्वोच्च भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:55 PM2019-11-15T23:55:43+5:302019-11-15T23:56:00+5:30

अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

Parbhani: Highest prices for soybeans in Gangakhed Market Committee | परभणी : गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला सर्वोच्च भाव

परभणी : गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला सर्वोच्च भाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.
जिल्ह्यात यावर्षी खरीपात २ लाख ३४ हजार हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा झाला होता. परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामाच्या प्रारंभी ज्यांनी पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार सोयाबीन आले. शिवाय अतिवृष्टीपासून बचावलेले; परंतु, काळवंडलेले सोयाबीनही काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे आले. हे सोयाबीन आता शेतकरी विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणत आहेत. शुक्रवारी परभणी बाजार समितीत ३७२ क्विंटल सोयाबीन आले. या सोयाबीनला कमीत कमी २ हजार ५०० ते जास्तीत जास्त ३ हजार ६५१ रुपये असा प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गंगाखेड बाजार समितीत २२० क्विंटल सोयाबीन आले. येथे प्रति क्विंटलला कमीत कमी ३ हजार ७५० ते जास्तीत जास्त ३ हजार ९०० रुपये भाव मिळाला. सोनपेठ बाजार समितीत १३५ क्विंटल सोयाबीन दाखल झाले. येथे सोयाबीनला ३ हजार रुपये ते ३ हजार ६५२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सेलू बाजार समितीत फक्त ८ क्विंटल सोयाबीन शुक्रवारी दाखल झाले. येथे सोयाबीनला ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
गुरुवारी बोरी बाजार समितीत ४१३ क्विंटल सोयाबीन दाखल झाले होते. येथे सोयाबीनला २ हजार ५०० ते २ हजार ९५० रुपये भाव मिळाला. पाथरीत ३०५ क्विंटल सोयाबीन दाखल झाले होते. येथे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १ हजार ९०० रुपये ते ३ हजार ६०४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. ताडकळस मध्ये १ हजार ६७५ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. येथे सोयाबीनला २ हजार ८०० ते ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांनी त्यांच्या खरेदीची माहिती संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अपडेट केली नाही. त्यामुळे या बाजार समित्यांमधील खरेदी- विक्रीची आकडेवारी कळू शकली नाही.

Web Title: Parbhani: Highest prices for soybeans in Gangakhed Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.