परभणी : पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:20 AM2018-06-10T00:20:33+5:302018-06-10T00:20:33+5:30
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.
दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी पहाटे जिल्हाभरात पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे- नाले पहिल्यांदाच वाहू लागले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस होता. जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. त्यात परभणी तालुक्यामध्ये ३०.२५ मि.मी., पालम २४, पूर्णा ८१, गंगाखेड ४८.७५, सोनपेठ ४३, सेलू ९, पाथरी २०, जिंतूर १६.५८ आणि मानवत तालुक्यात ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी ३३.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असला तरी हा मान्सूनचा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी मान्सूनच्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
पूर्णा नदीच्या पातळीत अल्पशी वाढ
पूर्णा- पूर्णा तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. पूर्णा मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील बरमाल, माटेगाव, आहेरवाडी, चुडावा या भागातील ओढ्यांना पाणी आले होते. हे पाणी पूर्णा नदीपात्रात दाखल झाले असून यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्णा नदी प्रथमच प्रवाही झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसामुळे पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेत भर पडली.
सोनपेठ ४३ मि.मी. पाऊस
सोनपेठ परिसरात ४३ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत होता. आवलगाव मंडळात ४२ मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत १९.६५ टक्के पाऊस झाला आहे.
रस्ता झाला चिखलमय
पालम तालुक्यातील जांभूळबेट हा रस्ता खराब झालेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून पाच गावांची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पालम ते जांभूळबेट हा ३ कि.मी. अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलामुळे वाहनधारकांना आपली वाहने रस्त्याच्या बाजुला लावून चक्क पायपीट करावी लागत आहे. याच रस्त्यावरुन सोमेश्वर, घोडा, आरखेड, सायळा, उमरथडी या गावांची वाहतूक होते. परंतु, रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. थोडाही पाऊस झाला तरी रस्त्याची दुरावस्था होत असल्याने पावसाळ्याचे चार महिने कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाण
चारठाणा- येथील महावीर चौक ते बसस्थानक या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली असून वाहतूक करताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. गावातील हा मुख्य रस्ता असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. थोड्या पावसातही गजमल किराणा ते देशमुख चौक दरम्यान रस्त्यावर मोठे पाणी साचते. त्यामुळे पायी चालणेही मुश्कील होत आहे.