परभणी : घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत घालविला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:04 PM2020-03-22T23:04:41+5:302020-03-22T23:05:13+5:30
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता.
गौतमनगरातील बबनराव भराडे म्हणाले, शासनाचा बाहेर न निघण्याचा निर्णय खरच आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच आहे. आपण बाहेर पडलो तर इतरांशी आपले बोलणे होते आणि त्यांच्या बोलण्यातून जंतू आपणाकडे येतात. त्यामुळे घरी बसणे हा खरच चांगला निर्णय आहे. दिवसभर कुटुंबाची काळजी घेतली.
रघुदास कॉलनी येथील सटवाजी सरकटे म्हणाले, ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे आम्ही घरी राहणेच पसंत केले. रविवार आणि त्यात ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केल्याने दुग्धशर्करा योग आला होता. आम्ही हा दिवस कुटुंबात घालविला. शहरात पोलिसांचा पहारा असल्यामुळे ते विचारपूस करत होते. त्यामुळे आम्ही घरी बसणे पसंत केले. नाती, नातवांना गोष्टी सांगितल्या. तसेच विश्रांती घेत टीव्हीवरील बातम्या ऐकल्या. तसेच स्वच्छतेकडे लक्षही दिले.