परभणी : रिमझिम पावसाने मान्सूनकडून उंचावल्या आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:24 PM2019-06-22T23:24:49+5:302019-06-22T23:25:24+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़
८ जून रोजी मृग नक्षत्रानंतर प्रत्यक्ष पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी मौसमी पाऊस होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या़ पाऊस लांबल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण होते़ तसेच मागील सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाºया जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याची समस्या आणखीच गंभीर होत चालली होती़ त्यामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या येथील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागली होती़
२२ जून रोजी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली़ काही भागात मध्यमस्वरुपाचा तर काही भागात रिमझिम पाऊस बरसल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे़
परभणी तालुक्यात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ हा पाऊस पेरणी योग्य नसला तरी शेतकरी सुखावला गेला आहे़ रात्री साधारणत: एक ते दीड तास पाऊस झाला़ पहाटेही पावसाची रिमझिम सुरू होती़ पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे़ पाथरी तालुक्यातही पहाटे २ वाजेपासूनच रिमझिम, मध्यमस्वरुपाचा पाऊस होत आहे़ गंगाखेड, मानवत, जिंतूर, सोनपेठ, पालम, सेलू या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली़ एकंदर पावसामुळे शेतकरी सुखावले असून, काही भागात धूळ पेरण्यांना सुरुवात झाली आहे़ कापसाची लागवड केली जात आहे़ शनिवारी जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ परभणी शहर व परिसरात सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही़ त्यामुळे अनेक महिन्यानंतर पावसाळी वातावरण तयार झाले होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या या पावसात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली़ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील दत्तनगर, कारेगाव रोड भागातील वीज पुरवठा खंडित झाला़ रात्रभर हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही़ त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला़
काही भागात पेरण्या
शनिवारी पहाटे झालेला पाऊस पेरणीयोग्य नसला तरी काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत़ विशेषत: सेलू, पाथरी, जिंतूर, मानवत या तालुक्यांमध्ये शेतकºयांनी पेरण्या सुरू केल्या आहेत़ त्यात कापसाची लागवड केली जात आहे़ जिल्ह्यामध्ये यापूर्वीही अनेक शेतकºयांनी धूळ पेरणी केलेली आहे़ मागील वर्षी धूळ पेरणी केलेल्या शेतकºयांना कापसाचा उतारा वाढवून मिळाला होता़ मागील वर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन अनेक भागात शेतकºयांनी धूळ पेरणीचा धोका पत्करला आहे़ विशेष म्हणजे कृषी विभागातील अधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, असा सल्ला देत असतानाही शेतकरी मात्र घाई करीत असल्याचे दिसत आहे़ अजूनही शेतकºयांनी घाई करू नये़ चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना सुरुवात करावी, असे आवाहन केले जात आहे़ दरम्यान, शनिवारी पहाटे झालेल्या पावसानंतर परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेत प्रथमच शेतकºयांची गर्दी दिसून आली़ कृषी निविष्टांच्या दुकानांवर खत, बियाणे आणि शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी दिवसभर शेतकºयांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ एकंदर या पावसाने शेतकºयांच्या आशा उंचावल्या आहेत़
सरासरी ६़८१ मिमी पाऊस
शनिवारी पहाटे ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६़८१ मिमी पाऊस झाला आहे़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १९़६७ मिमी, तर सेलू तालुक्यात ११ मिमी, पाथरी ९ मिमी, मानवत ६ मिमी, सोनपेठ ५ मिमी, परभणी ४़८८ मिमी, पूर्णा ४़२० मिमी आणि गंगाखेड तालुक्यात १़५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़
पूर्णा तालुक्यात जोरदार हजेरी
तालुक्यातील पाचही मंडळात २१ जून रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली असून, २२ जून रोजीही रिमझिम पाऊस सुरू होता़ शुक्रवारी साधारणत: रात्री ११़३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला़ पहाटे ८ वाजेपर्यंत आधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या़ तालुक्यात सरासरी २१ मिमी पाऊस झाला आहे़ त्यात पूर्णा मंडळामध्ये ३ मिमी, चुडावा २ मिमी, कात्नेश्वर ४ मिमी, लिमला २ मिमी तर ताडकळस मंडळात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे़