परभणी : घरकुलाच्या खोदकामात आढळला मानवी सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:54 AM2019-05-25T00:54:48+5:302019-05-25T00:55:48+5:30
घरकुल बांधकामाचे खोदकाम करीत असताना मानवी सापळा आढळल्याचा प्रकार सेलू शहरातील वालूरनाका येथील पारधीवाड्यात २४ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): घरकुल बांधकामाचे खोदकाम करीत असताना मानवी सापळा आढळल्याचा प्रकार सेलू शहरातील वालूरनाका येथील पारधीवाड्यात २४ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील वालूरनाका परिसरातील पारधीवाडा भागात घरकुल योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी खोदकाम करीत असताना एक मानवी सापळा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात राधाबाई हिरामन काळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सापळा लक्ष्मण गोमाजी पवार यांचा असल्याचा संशय राधाबाई यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण पवार हे २० वर्षांपासून गायब असल्याची माहिती मिळाली. हा सापळा पाच ते सहा वर्षांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, संजय साळवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. पुणे येथील प्रयोगशाळेत डी.एन.ए. तपासणीसाठी हा सापळा पाठविला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.