परभणी: शेकडो ट्रॅक्टरने रात्रंदिवस वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:49 AM2019-03-17T00:49:57+5:302019-03-17T00:50:53+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात अधिकृतरित्या असलेल्या वाळुच्या धक्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे वाळूमाफियांनी गोदावरी पात्रात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टरच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गोंडगाव, खळी परिसर, महातपुरी, मुळी बंधारा परिसर, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, झोला पिंपरी, मसला आदी ठिकाणाहून रात्रंदिवस वाळुचा उपसा सुरूच ठेवल्याने गोदावरी नदीपात्र वाळवंट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा करून नदी पात्राजवळ मोठ-मोठे वाळू साठे तयार करण्यात आले आहेत. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर चूकवित हायवा, टिप्पर आदी वाहनांद्वारे वाळू साठ्यांमधील वाळू बाहेरील जिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने महसूलचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना वाळूमाफिया मात्र वाळू दिसेल त्या ठिकाणावरून चोरून नेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील धारखेड शिवारातील सर्व्हे नंबर १८३, १८४, १८५ मधील शेत शिवाराजवळून झोला येथील वाळूमाफिया ट्रॅक्टरद्वारे रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करीत आहेत. यामुळे गोदाकाठी असलेल्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. तलाठी, सरपंच व पोलीस पाटील यांच्यासह शेतकºयांनीही वाळू माफियांना आवर घालण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसेच सय्यद समीर सय्यद सलीम या शेतकºयानेही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी तक्रार करून गोदावरी नदी परिसरातील वाळुची चोरी थांबवावी, अशी मागणी केली आहे.
एका वाळू : धक्क्याचा लिलाव झाल्याची माहिती
४गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी व दुस्सलगाव येथील दोन वाळू धक्यांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. २१ फेब्रुवारीपासून ते १४ मार्चपर्यंत राबविण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेत चिंचटाकळी येथील वाळू धक्का ६१ लाख ११०० रुपयांची बोली मिळाल्याने या धक्याचा लिलाव झाल्याची माहिती आहे. याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधला असता १६ मार्च रोजीपर्यंत वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याची अधिकृत माहिती तहसील प्रशासनास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
हजारो ब्रास वाळूची चोरी
४गंगाखेड तालुक्यातील १३ वाळू धक्क्यांपैकी सद्य स्थितीत एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नाही. यामुळे परिसरातील वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळूची चोरी केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील वाळू धक्क्यांचा लिलाव तत्काळ करून वाळू चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तालुकावासियांतून होत आहे.