परभणी: अवैध वाळू उपशाने नदीपात्र पडले कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:27 AM2019-03-13T00:27:42+5:302019-03-13T00:27:55+5:30
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोनपेठ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात काही धाडसी कारवाया केल्या होत्या. या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र काही दिवसानंंतर अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका व पोहंडूळ येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी हे वाळू तस्कर अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, बीड, परळी या ठिकाणी अवैध वाळू विक्री करीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून वाळुची मागणी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने वाळू माफियांनी संधीचे सोने करण्यासाठी तालुक्यातील वाणीसंगम येथील नदीपात्रातून रात्र-दिवस वाळूचा उपसा सुरू केला आहे. नदीपात्रातून उपसलेल्या वाळुचे इतरत्र ठिकाणी मोठमोठे साठे निर्माण केले आहेत. पावसाळ्यात वाळूला असलेली मागणी लक्षात घेऊन वाळू माफिया सक्रिय झाले असून तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोहंडूळ या ठिकाणच्या नदीपात्रातून रात्रं-दिवस बेसुमार वाळू उपसा सुरू केल्याने गोदावरीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्याच बरोबर वाळू उपशाने नदीपात्राची चाळणी झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही आगामी काळात अवैध वाळू उपशामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीने वाळूमाफियांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे वाळू चोरीला चाप बसला होता. मात्र तालुका महसूल प्रशासनाकडून आता केवळ वाळू माफियांविरुद्ध बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.
माफियांची अधिकाºयांवर पाळत
सोनपेठ तालुक्यातील पाच ते सहा गावांतील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूमाफिया महसूलच्या अधिकारी व कर्मचाºयांवर मोबाईलच्या सहाय्याने पाळत ठेवत आहेत. वाणीसंगमकडे जाणाºया रस्त्यांवर काही माफियांनी रोजंदारीवर माणसेही नेमली आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी नदीपात्राकडे किंवा गावामध्ये येण्याची चाहूल लागताच माफियांना मोबाईलद्वारे माहिती देत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.
सोनपेठ तालुक्यातील नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपशावर जिल्हाधिकाºयांनी अंकुश ठेवला होता; परंतु, महसूल प्रशासनाकडून होणारी कारवाई थातूरमातूर असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून होणाºया कारवाईची धार वाढवावी, अशी मागणी वाणीसंगम येथील ग्रामस्थांमधून सातत्याने केली जात आहे.