परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:16 AM2019-03-04T00:16:27+5:302019-03-04T00:16:44+5:30
जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणाहून पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रातील वाळू चांगल्या प्रतीची असल्याने या वाळूला जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी मागणी आहे; परंतु, या ठिकाणच्या वाळू घाटाचे लिलाव अद्याप तालुका प्रशासनाकडून करण्यात आले नाहीत; परंतु, वाळू माफियांनी जिंंतूर तालुक्यातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणी आपले पॉईंट तयार केले आहेत. येथून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक केली जाते. ही वाळू जिंतूर, मंठा, चारठाणा, सेलू, सेनगाव यासह अन्य ठिकाणी पोहचिती केल्या जाते. वझर या ठिकाणी तर महसूल पथकाचा अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नसल्याने बिनधास्तपणे वाळुचा उपसा करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री केल्या जात असल्याचे समोर आले आहे. महसूलचे पथक कार्यवाही करण्याच्या उद्देशाने निघाले तर पथक पोहचण्याअधीच वाळू माफियांनी खबर लागते व तेथून हे माफिया पोबारा होतात. या वाळू विक्रीतून मोठा पैसा मिळत असल्याने व कार्यवाहीची भिती राहिली नसल्याने वाळू माफियांनी अंबरवाडी येथे नवीन पॉर्इंट सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तीन महिन्यापूर्वी तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली होती. मात्र तहसीलदारांची कार्यवाही तोडकी पडल्यानेच बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. वझर येथे काही दिवसांपूर्वी वाळू माफियांवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवरही या माफियांनी हल्ला केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.