परभणी : अंतेश्वरमधील अवैध वाळूसाठा केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:14 AM2019-06-14T00:14:03+5:302019-06-14T00:14:29+5:30
तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
पालम तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाकडून विविध उपाय करण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून गोदावरीच्या काठावरील अवैध वाळूचे साठे पथकाकडून जप्त करण्यात येत आहेत.
महसूलच्या पथकाची नजर चुकविण्यासाठी तालुक्यातील रहाटीच्या शिवारातून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठविण्यात आली होती. याची पाहणी करून महसूलच्या पथकाने २५० ब्रास वाळू जप्त करून उचललेली आहे.
ही वाळू तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी घरकूल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून या वाळूचे वाटप सुरू आहे.
तहसील कार्यालयातील पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकात तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळाधिकारी के पी शिंदे, तलाठी विजय राठोड, सचिन सरोदे आदींचा समावेश आहे.
पथक दाखल होताच: वाळू चोरांनी केले पलायन
४वाळूची चोरी पकडण्यासाठी महसूल विभागाकडून पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे पथक दिवसा व रात्री गोदावरीच्या काठावरील गावांना अचानक भेटी देऊन कारवाई करीत आहे. नायब तहसीलदार श्रीरंग कदम व तलाठी देसाई यांनी १२ जून रोजी दुपारच्या सुमारास रावराजुर व खुर्लेवाडी येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणांना भेट दिली.
४पथकाला पाहताच वाळू चोरांनी आजूबाजूच्या परिसरात धूम ठोकली. याठिकाणी अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले असून वाळूची चोरी प्रचंड प्रमाणात झाल्याचे पथकाला पहावयास मिळाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे मत नदीकाठावरील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.